गुंतवणुकीची एक लिंक अन् मानवतच्या तरुणाला २९ लाखांचा फटका! पाच बँक खात्यांत गेले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 19:26 IST2026-04-09T19:25:05+5:302026-04-09T19:26:35+5:30
मानवत पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइलधारक आणि पाच विविध बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल

गुंतवणुकीची एक लिंक अन् मानवतच्या तरुणाला २९ लाखांचा फटका! पाच बँक खात्यांत गेले पैसे
मानवत : शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळेल, असे आमिष दाखवून मानवत येथील एका तरुणाची २९ लाख ७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइलधारक आणि पाच विविध बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्जुन अशोकराव पवार (३६, रा. पावरलूम, मानवत) यांना ९ डिसेंबर २०२५ रोजी एका अज्ञात क्रमांकावरून लिंक आली होती. या लिंकद्वारे त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. या ग्रुपमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखविण्यात आले. सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकलेल्या पवार यांनी वेळोवेळी मोठी रक्कम गुंतवली.
अशा प्रकारे झाली फसवणूक
आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि त्यांना विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडले. यामध्ये जेना एंटरप्रायजेस, सागर टेक्सटाईल, तन्वी एंटरप्रायजेस आणि अदबास क्लोथिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या नावावर असलेल्या बँक खात्यांचा समावेश आहे. फिर्यादीने एकूण २९ लाख ७ हजार रुपये या खात्यांमध्ये जमा केले. मात्र, परतावा मिळण्याऐवजी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
पाच जणांसह मोबाइलधारकांवर गुन्हा
याप्रकरणी पोलिसांनी मोबाइल क्रमांक ७४८४९६७२१८, ९९१५८९५५४९, ७३१८८७४७७०, ८९६८७४६९१५ च्या धारकांसह त्यांच्या बँक खातेदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद देवकते करीत आहेत.