बंद दुकानांसमोर ग्राहकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST2021-06-01T04:13:59+5:302021-06-01T04:13:59+5:30
मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा आणि भाजीपाला दुकान वगळता इतर ...

बंद दुकानांसमोर ग्राहकांची प्रतीक्षा
मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा आणि भाजीपाला दुकान वगळता इतर सर्व दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांना दररोज हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, दुकान भाडे, वीज भाडे यासह कर्जाचे हप्ते असा आर्थिक बोजा दिवसेंदिवस वाढत असल्याने बाजारपेठ कधी सुरू होते? असा प्रश्न या व्यापाऱ्यांना पडला आहे.
दरम्यान, मागच्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी झाला असून, व्यवहार लवकरच पूर्वपदावर येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे; परंतु सध्यातरी बाजारपेठ सुरू करण्याचे आदेश निघाले नाहीत. राज्यस्तरावरून कमी संसर्ग असलेल्या जिल्ह्यांमध्ये बाजारपेठ सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्हिटी १० पेक्षा कमी असल्याने बाजारपेठ लवकरच सुरू होईल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. त्यातूनच दोन दिवसांपासून शहरातील बाजारपेठेत वर्दळ वाढली आहे. प्रशासनाच्या आदेशामुळे दुकाने बंद असली तरी या बंद दुकानांसमोर थांबून व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करीत आहेत. दररोज किमान थोडाबहुत व्यापार करून कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्च भागविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोमवारी शहरातील बाजारपेठ भागात बऱ्यापैकी वर्दळ पाहावयास मिळाली. दुकानांचे शटर बंद होते; परंतु तरीही व्यवसाय होईल, या आशेने व्यापारी दुकानाच्या बाहेर थांबून असल्याचे दिसून आले.
नागरिक झाले बिनधास्त
संसर्ग कमी झाल्याने नागरिकही बिनधास्त झाले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाली असून, बाजारपेठ भागात गर्दी दिसून येत आहे. मुख्य रस्त्यांसह छोट्या रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. विशेष म्हणजे, शहरातील प्रमुख मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी पोलीस प्रशासनाकडूनही फारशी कारवाई केली जात नाही. त्यामुळे शहरातील जनजीवन काहीसे सैल झाल्याचे दिसून येत आहे.