कोरोनाचा कहर सुरूच; ५५३ रुग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:45+5:302021-04-06T04:16:45+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सलग दुसऱ्या आठवड्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ५ एप्रिल रोजी ...

कोरोनाचा कहर सुरूच; ५५३ रुग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सलग दुसऱ्या आठवड्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ५ एप्रिल रोजी ५५३ रुग्ण नव्याने नोंद झाले असून, आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर धोकादायक पद्धतीने वाढला आहे.
मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. सुरुवातीला १०० ते २०० रुग्ण दररोज नोंद होत होते. आता ही संख्या ४०० पेक्षाही अधिक झाली असून, सोमवारी एकाच दिवशी ५५३ रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाला २ हजार ४१५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ६९९ अहवालामध्ये २८६, तर रॅपिड टेस्टच्या ७१६ अहवालामध्ये २६७ जण पॉझिटिव्ह आहेत.
रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. सोमवारी एकूण ८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे ४५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६ हजार ८२६ झाली असून, त्यापैकी १३ हजार १९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३ हजार १७७ रुग्ण उपचार घेत आहेत.
येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये १९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात ३६६ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच अक्षदा मंगल कार्यालयात ८३, तर होम आयसोलेशनमध्ये २ हजार ३३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शासकीय रुग्णालयात पावणे
पाचशे रुग्ण
परभणी शहरातील शासकीय संस्थांमध्ये ४७९ रुग्ण उपचार घेत आहेत, तर दुसरीकडे शहरातीलच सर्व खासगी रुग्णालयांमध्ये मिळून ३६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शासकीय संस्थांमध्ये रुग्णांसाठी खाटा उपलब्ध असल्या तरी खासगी रुग्णालयात मात्र खाटा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.