Corona virus in Parbhani : ग्रामीण भागातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचा 'परभणी पॅटर्न' राज्यात लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 20:11 IST2020-03-29T20:06:28+5:302020-03-29T20:11:31+5:30
मुख्यमंत्र्यांची व्हिसीमध्ये माहिती

Corona virus in Parbhani : ग्रामीण भागातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचा 'परभणी पॅटर्न' राज्यात लागू
परभणी : कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात पोहचू नये, या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात सुरू केलेल्या सर्वेक्षणाचा पॅटर्न संपूर्ण राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या व्हिडीओ कॉन्फ्रन्स बैठकीत दिल्या आहेत़ त्यामुळे परभणीतील हा पॅटर्न यशस्वी ठरला आहे़
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, आरोग्य विभाग या संसर्ग थांबवण्यासाठी नानाविध प्रयत्न करीत आहे़ सुरुवातीला पुणे आणि मुंबई अशा मोठ्या शहरांमध्येच कोरोनाबाधीत रुग्ण आढळले़ त्यानंतर ते राज्यातील इतर मोठ्या शहरातही आढळू लागले़ त्यामुळे राज्यभरात संचारबंदी आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सिमाबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या निर्णयानंतर पुणे, मुंबईसह मोठ्या शहरात शिक्षण आणि रोजगारासाठी स्थलांतरित झालेले नागरिकांचे लोंढे गावाकडे परतू लागले़ या नागरिकांच्या माध्यमातून कोरोनाचाही शिरकाव होवू नये, याची खबरदारी घेतली जात आहे़ याच पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रथम जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या संकल्पनेतून आशा सेविकांच्या माध्यमातून गावा-गावांत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोठ्या शहरांमधून आलेल्या नागरिकांमध्ये काही लक्षणे आढळत तर नाहीत ना याचा शोध या सर्वेक्षणातून घेतला जात आहे़ त्यातूनच आशा सेविकांना १३ तक्त्यांचा एक अर्ज देण्यात आला असून, त्यात माहिती भरून घेतली जात आहे़ जिल्ह्यात हे काम १८ मार्चपासून सुरू करण्यात आले़ ते जवळपास पूर्ण झाले आहे़ या सर्वेक्षणामुळे परदेशातून किती नागरिक आले? परजिल्ह्यातून किती नागरिक दाखल झाले? या नागरिकांना कोणता आजार आहे? श्वसन विकाराचे लक्षण? आदी माहिती संकलित झाली आहे़ या माहितीच्या आधारे आरोग्य यंत्रणेला आता उपचार करणे सोयीचे होत आहे़ जिल्ह्यात हा सर्वे जवळपास पूर्ण झाला आहे़याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील अधिकाºयांसमोर मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फ्रन्स बैठक घेतली़ या बैठकीत जिल्हाभरात केलेल्या सर्वेक्षणाची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि सीईओ पृथ्वीराज यांनी दिली़ या माहितीच्या आधारेच अशा प्रकारचे सर्वेक्षण संपूर्ण राज्यात करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत़ त्यामुळे परभणीतील सर्वेक्षणाची ही संकल्पना यशस्वी ठरली आहे़
श्वसन विकाराच्या रुग्णांचा घेतला शोध
या सर्वेक्षणामध्ये देशांतर्गत मोठ्या शहरातून आलेले नागरिक, परदेशातून आलेले नागरिक यांचा शोध घेण्याबरोबरच या नागरिकांना श्वसन विकाराच्या संदर्भात असलेल्या लक्षणांचीही नोंद घेण्यात आली आहे़ आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात २८ हजार १८० नागरिक मोठ्या शहरातून दाखल झाले असून, त्यापैकी ६९८ जणांना श्वसन विकाराची लक्षणे आढळल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे़ तसेच हे सर्वेक्षण करीत असताना १ लाख ६८ हजार १०७ जनजागृती पॉम्पलेट वितरित करण्यात आले आहेत़