गंगाखेड: लॉकडाऊनमध्ये कापड दुकान उघडण्याची परवानगी नसताना कापड दुकान उघडणाऱ्या व्यापाऱ्याविरुध्द जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी २४ मे रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी २५ मे रोजी याच दूकानात सकाळी ग्राहक आढळल्याने अन्य एका पथकाने दंडात्मक कार्यवाही करत दुकान सिल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
शहरात परवानगी नसताना चप्पल, बूट व कापडाचे दुकान सुरू असल्याचे २४ मे रोजी दुपारी साडेचार वाजता दिलकश चौकाजवळ गस्तीवर असलेल्या पथकास निदर्शनास आले. नगर परिषद सफाई कर्मचारी सुधीर गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २४ मे रोजीच्या मध्यरात्री साडेबारा वाजता अमोल फूट वेअर व रामचंद्र रंगनाथ रेवणवार या दुकान मालकांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही दूसऱ्या दिवशी सकाळी २५ मे रोजी रामचंद्र रंगनाथ रेवणवार या कापड दुकानाच्या मालकाने दुकान सुरू ठेवून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमविली.
नगर परिषद पथकातील उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, शेख अफजलोद्दीन, अभियंता अक्षय तळतकर, देसाई, सुरेश मणियार, चंद्रकांत पाठक, अमोल जगतकर, सुधीर गायकवाड, सागर जगतकर, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, जमादार उमाकांत जामकर, चंद्रशेखर कावळे आदींना पाहणीत ही बाब दिसून आली. यानंतर पोलीस व नगर परिषद प्रशासनाने केलेल्या संयुक्त कार्यवाहीत दुकानात गर्दी करणाऱ्या ४७ जणांना प्रत्येकी २०० रुपये दंड आकारला. तसेच कापड दुकान मालकाला २० हजार रुपये दंड आकारून एकूण २९ हजार ४०० रुपये दंड वसूल केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कापड दुकानदाराने परत दुकान सुरू ठेवल्याने प्रशासनाने लॉकडाऊन संपेपर्यंत कापड दुकान सिल करण्याची प्रक्रिया मंगळवारी दुपारी पुर्ण केली. पोलीस व नगर परिषद प्रशासनाने केलेल्या या संयुक्त कार्यवाहीने व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे.