कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले, मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST2021-05-30T04:15:43+5:302021-05-30T04:15:43+5:30
परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे ४९ हजार ७१४ रुग्ण झाले आहेत; ...

कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले, मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली
परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे ४९ हजार ७१४ रुग्ण झाले आहेत; तर कोरोनामुळे १२२३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात तरुणांसह ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. घरातील कर्त्या पुरुषाचे मृत्यू झाल्याचे प्रकारही घडले आहेत. यामुळे संपत्ती तसेच वारसदार यांच्या नावे ही संपत्ती मृत्यूपत्रात नमूद करून त्याची नोटरी किंवा रजिस्टर्ड मृत्यूपत्र करण्यास काहीजण प्राधान्य देत आहेत. मागील वर्षभरात हे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे.
असे आहेत मृत्यूपत्र करण्याचे प्रकार
घर, शेती तसेच अन्य संपत्ती कुटुंबातील सदस्यांच्या नावे करण्यासाठी त्याची काहीजण वकिलांमार्फत नोटरी करतात. तर काहीजण साध्या कागदावरही त्याची नोंद करून ठेवतात. या नोंदीलाही कायद्याने मान्यता आहे. तसेच रजिस्टर्ड नोटरी केल्यास त्याचे शुल्क भरून शासन दरबारी त्या मृत्यूपत्राची नोंद राहते.
यंदा नोंदणीच प्रमाण वाढले
शहरातील जिल्हा न्यायालय परिसरातील नोटरी वकील तसेच रजिस्ट्री कार्यालयात रजिस्टर्ड मृत्यूपत्र करण्याचे प्रमाण वाढले आहे. मागीलवर्षी २० मृत्यूपत्र बनविल्याची नोंद कोरोनापूर्वी होती. तीच यंदा कोरोनामध्ये ३५ ते ४० इतकी झाली आहे.
अशी आहे आकडेवारी
शहरातील नोटरी वकील - ३० ते ३५
कोरोनापूर्वी झालेली नोंदणी - २०
कोरोना कालावधीतील नोंदणी - ३५
कोरोना कालावधीत काही नागरिकांनी आपल्या मृत्यूपूर्वी मृत्यूपत्र बनविले आहे. मार्च २०२० नंतर पहिल्या लाटेत हे प्रमाण कमी होते. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण वाढले आहे. १५ ते २० टक्के नागरिकांनी मृत्यूपत्र केल्याचे नोटरीतील आकडेवारीवरून दिसून येते. - ॲड. गणेशकुमार सेलूकर
परभणीत ३० ते ३५ नोटरी वकील कार्यरत आहेत. काहीजणांकडे मृत्यूपत्र बनविण्यासाठी आले आहेत. वारसांचे घरातील कर्ता व्यक्ती अकाली मृत्यू पावल्यानंतर होणारे संपत्तीचे वाद टाळण्यासाठी अनेकजण मृत्यूपूर्वी मृत्यूपत्र तयार करण्यास येत असल्याचे दिसून आले. - ॲड. विद्याधर हट्टेकर.