सेलू तालुक्यातील ८० गावांना कोरोनाचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:16 AM2021-05-10T04:16:47+5:302021-05-10T04:16:47+5:30

गतवर्षी शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक होती. त्या तुलनेत ग्रामीण भागाने कोरोनाला गावच्या वेशीवर रोखण्यात चांगले यश मिळवले होते. ...

Corona besieges 80 villages in Selu taluka | सेलू तालुक्यातील ८० गावांना कोरोनाचा वेढा

सेलू तालुक्यातील ८० गावांना कोरोनाचा वेढा

googlenewsNext

गतवर्षी शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक होती. त्या तुलनेत ग्रामीण भागाने कोरोनाला गावच्या वेशीवर रोखण्यात चांगले यश मिळवले होते. पंरतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत असताना दिसत आहे. मार्चपासून ग्रामीण भागात १ हजार ८४२ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. यात १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात मागील एक वर्षापासून आरोग्य विभागाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे आणि मुलांचे दोन्ही वसतिगृहांत कोरोना केअर सेंटर उभारले आहेत. मात्र, एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दोन्ही १६० खाटांचे सेंटर फुल्ल झाले. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी गृहविलगीकरणावर भर देऊन कोरोना केअर सेंटरवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. परंतु, १५ दिवसांचा कालावधी उलटूनही केवळ १० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित काम कधी पूर्ण होईल, याची खात्री आरोग्य विभागही देऊ शकत नाही. कारण, संबंधित यंत्रणेने केवळ ऑक्सिजन पाइपलाइनचे काम पूर्ण केले. दरम्यान, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडकडून उभारण्यात आलेल्या बळीराजा मोफत कोरोना केअर सेंटरमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सहा गावे बनली हाॅटस्पाॅट

मार्च महिन्यापासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सद्य:स्थितीत मोरेगाव येथे ५०, हट्टा २२, कुपटा २६, धनेगाव १५, लाडनांद्रा २७, देऊळगाव ३१ येथे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ही गावे कोरोनाची हाॅटस्पाॅट बनली आहेत. तसेच ८० गावांमध्ये सद्य:स्थितीत कोरोनाबाधित रुग्ण आहेत. दरम्यान, लक्षणे दिसत असतानादेखील दुर्लक्ष करणे, मास्क आणि फिजिकल डिस्टन्सचा पडलेला विसर, समारंभात गर्दी करणे आदी कारणांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Corona besieges 80 villages in Selu taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.