खतांच्या दराबाबत संभ्रमावस्था कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST2021-05-22T04:16:47+5:302021-05-22T04:16:47+5:30
जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून ,खत, बियाणे, कीटकनाशकांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मागील आठ दिवसांपासून मोंढा ...

खतांच्या दराबाबत संभ्रमावस्था कायम
जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून ,खत, बियाणे, कीटकनाशकांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मागील आठ दिवसांपासून मोंढा बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. यावर्षी खताच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व शेतकऱ्यांनी खतांच्या दरवाढीबाबत संताप व्यक्त करून ही दरवाढ मागे घ्यावी, यासाठी निवेदने प्रशासनाला सादर केली. खत दरवाढीबाबत वाढता संताप पाहून केंद्र शासनाने पिकांसाठी आवश्यक असलेली खते शेतकऱ्यांना जुन्याच किमतींना मिळावीत यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात रासायनिक खतावरील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली आहे; मात्र हा निर्णय होऊन दोन दिवसांचा कालावधी उलटला आहे. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाला याबाबत कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात दाखल झालेला खत नव्या दराने विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातील नवामोंढा बाजारपेठेत खत विक्रीबाबतचा आढावा घेतला. तेव्हा या बाजारपेठेतील बहुतांश दुकानांमध्ये १०:२६:२६, १२: ३२: १६, डीएपी, आदी कंपनींचे खते नव्या दरानुसारच विक्री होऊ लागले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली आहेत का, याचा आढावा घेतला. तेव्हा केंद्र स्तरावर खताच्या किमतीबाबत निर्णय झाला असला तरी स्थानिक प्रशासनाला अद्यापपर्यंत कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत, असे उत्तर मिळाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खतांच्या किमतीबाबत तत्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना होणाऱ्या गैरसोयीबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरूच
खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपल्याने शेतकरी बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्यासाठी परभणीच्या नवामोंढा बाजारपेठेत दाखल होत आहेत. मात्र, खताच्या दरवाढीबाबत केंद्र शासनाने अनुदान देऊन खताच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शुक्रवारी नवामोंढा बाजारपेठेत जुन्या किमतीत खत मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, दुकानदारांकडून नव्या दराने खत विक्री करण्यात येऊ लागले. त्यामुळे शासनाचा निर्णय होऊनही केवळ स्थानिक प्रशासनाला सूचना न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरूच असल्याचे शुक्रवारी परभणीच्या बाजारपेठेत दिसून आले.