परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. कोविड केंद्राच्या बाहेर निवास व्यवस्था नसल्याने नसल्याने नातेवाइकांची हेळसांड होत आहे.
येथील आयटीआय, जिल्हा परिषदेची नवी इमारत, अक्षदा मंगल कार्यालय या इमारतींत कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, या रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाइकांसाठी कोणतीच सुविधा नाही. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणाहून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच गैरसोय होत आहे. आयटीआय परिसरात नातेवाइकांसाठी टेंट उभारला खरा. मात्र, पाणी, वीज या सुविधा नसल्याने नातेवाईक त्रस्त आहेत.
दोन्हींकडून गोची
रुग्ण कोरोनाबाधित असल्याने शहरात नातेवाईक असतानाही त्यांच्या घरी वास्तव्याला जाता येत नाही. शिवाय केंद्राच्या परिसरात खाद्यपदार्थ तसेच इतर सुविधांची दुकाने नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या आप्तजनांची दोन्ही बाजूने गोची होत आहे. उघड्यावर रात्र काढण्याची वेळ नातेवाइकांवर आली आहे. प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
येथील आयटीआय परिसरात नातेवाइकांसाठी कोणतीच सुविधा नाही. त्यामुळे रात्रभर रुग्णालयाबाहेर ताटकळत थांबावे लागते. विशेष म्हणजे या ठिकाणी गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग होण्याची भीती वाटते. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
- प्रकाश साबणे
परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयाबाहेर नातेवाइकांसाठी निवासाची सुविधा नसल्याने याच परिसरात कोठेही थांबून रात्र काढावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधाही या भागात नसल्याने खूप गैरसोय होत आहे.
- नातेवाइकांची प्रतिक्रिया
आयटीआय परिसरात आम्ही थांबलो आहोत. या भागात प्रशासनाने एक टेंट उभारला आहे. मात्र, वीज आणि पाण्याची सुविधा या ठिकाणी नाही. रात्री डासांचा त्रास होतो. या भागात खाद्यपदार्थांची दुकाने नसल्याने जेवणाचीही गैरसोय होते.
- नातेवाइकांची प्रतिक्रिया