पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांची वाढली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:17 IST2021-05-23T04:17:00+5:302021-05-23T04:17:00+5:30
परभणी : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी ...

पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांची वाढली चिंता
परभणी : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी लस मिळत नसल्याने नागरिकांच्या चिंता कायम आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने २०५ केंद्रांवर सुविधा केली आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला असला तरी प्रत्यक्ष लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, काेरोना योद्धे, त्यानंतर ६० वर्षांच्या पुढील ज्येष्ठ नागरिक आणि १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी लस उपलब्ध करण्यात आली. परंतु, मुबलक प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध झाला नाही. लसीकरणासाठी लाभार्थ्यांची संख्या लाखोंमध्ये असताना केवळ काही हजारांतच जिल्ह्याला लस मिळाली. त्यामुळे लसीकरणातील अडथळे सुरुवातीपासून ते आजपर्यंत कायम आहेत.
मागील आठ दिवसांपासून तर जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद ठेवावे लागत आहे. शहरी भागातील आरोग्य केंद्रांबरोबरच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातूनही लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, लस उपलब्ध नसल्याने २०५ पैकी केवळ शहरातील नऊ केंद्रांवर लसीकरण झाले. त्यामुळे उर्वरित १९६ केंद्र मागील आठ दिवसांपासून बंद आहेत. आरोग्य विभागाने पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
शहरात लसीकरण सुरू
महानगरपालिकेच्या हद्दीत नऊ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. या केंद्रावरही प्रत्येकी ५० ते ३० डोसेस उपलब्ध आहेत. शनिवारी दिवसभरात केवळ २६६ नागरिकांनाच लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे आठ दिवसांपासून १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण ठप्प आहे. त्यामुळे या वयोगटासाठी लस केव्हा मिळते? याची प्रतीक्षा लागली आहे.