वीजपुरवठा खंडित न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST2021-03-28T04:16:42+5:302021-03-28T04:16:42+5:30
परभणी : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन महावितरणने वीजपुरवठा ...

वीजपुरवठा खंडित न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
परभणी : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन महावितरणने वीजपुरवठा खंडित करु नये, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.
यासंदर्भात महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना २६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने पत्र देण्यात आले आहे. त्यात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित अतिगंभीर रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता आहे. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रस्त्यावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे व खांबावरील पथदिवे सुरळीतपणे सुरु असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी संबंधित सर्व आस्थापना व सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व आस्थापनांच्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी संबंधित इन्सिडेंट कमांडर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेण्यात यावी तसेच या आस्थापनांच्या ठिकाणी २४ तास वीजपुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी, असेही आदेश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत.