बंद दाराआड व्यवहार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST2021-05-30T04:15:58+5:302021-05-30T04:15:58+5:30
शहरात शनिवारी भाजीपाला तसेच किराणा दुकानांनाही बंदी घालण्यात आली तर शासकीय कार्यालय आणि अन्य व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश ...

बंद दाराआड व्यवहार सुरूच
शहरात शनिवारी भाजीपाला तसेच किराणा दुकानांनाही बंदी घालण्यात आली तर शासकीय कार्यालय आणि अन्य व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश कायमच आहेत. तरीही अनेक ठिकाणी दुकाने बाहेरून बंद तर आतमध्ये ग्राहकाला प्रवेश देऊन खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याचे शनिवारी दिसून आले. कपडे, चप्पल, बूट, मोबाइल आणि अन्य साहित्य खरेदी करताना काही ठिकाणी नागरिक दिसून आले.
केवळ कोरोना चाचणीकडे लक्ष
पोलीस व महापालिका प्रशासन शहरात नेमलेल्या तीन ठिकाणच्या कॅम्पवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याकडे लक्ष देत आहे. मात्र, बाजारात बंद दाराआड सुरू असलेल्या व्यवहाराकडे पोलीस पथकासह महापालिकेने नियुक्त केलेल्या पथकांचे दुर्लक्ष होत असल्याचे मागील अनेक दिवसांपासून दिसून येते.
तालुक्यात कारवाया, मात्र शहरात दुर्लक्ष
जिल्ह्यातील गंगाखेड, पाथरी, सेलू, जिंतूर या चार तालुक्यांच्या ठिकाणी विविध प्रतिष्ठाने सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाया झाल्या. परभणी महापालिका व पोलीस पथक दिवसाआड काही ठिकाणी किरकोळ दंड लावून कारवाई करीत आहे. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर दुकाने बंद दाराआड व्यवहार करत असल्याचे या पथकास दिसून येत नाही.