विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST2021-04-01T04:18:01+5:302021-04-01T04:18:01+5:30
शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची गर्दी कायम परभणी : शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. असे ...

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची गर्दी कायम
परभणी : शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील शासकीय कार्यालय मात्र ५० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी कामावर येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सात दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. या काळात जिल्हाभरातील बाजारपेठ बंद असून, जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल संचारबंदीमुळे थांबली आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने बाजारपेठेच्या उलाढालीवर अनेकांचे रोजगार अवलंबून आहेत. मात्र बाजारपेठ बंद असल्यामुळे रोजंदारी कामगारांनाही त्याचा फटका सहन करावा लागला.
वृक्षारोपण मोहिमेतील झाडे वाळू लागली
परभणी : मागील वर्षीच्या पावसाळ्यात वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली; मात्र या झाडांना पाण्याची सुविधा केली नाही. सध्या उन्हामुळे झाडांना पाणी कमी पडत असून, ही झाडे वाळू लागली आहेत. जिल्हा प्रशासनाने वृक्षारोपण मोहिमेतील झाडांसाठी पाण्याची सुविधा करावी, अशी मागणी होत आहे.
गुटख्याच्या विक्रीला लागेना लगाम
परभणी : राज्यात बंदी असलेला गुटखा जिल्ह्यात राजरोसपणे विक्री होत आहे. याविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याने हा प्रकार वाढला आहे. मध्यंतरी पोलीस प्रशासनाकडून गुटख्याचा साठा पकडण्याच्या कारवाया करण्यात आल्या; परंतु तरीही शहरात आणि जिल्हाभरात गुटखा सहज उपलब्ध होत आहे.
गंगाखेड रस्त्यावर धुळीचा त्रास
परभणी : गंगाखेड रस्त्याच्या निर्मितीचे काम सध्या सुरू आहे. यासाठी शहरालगत एका बाजूने रस्ता खोदून ठेवला असून, एका बाजूने सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यात आला आहे. रस्त्यांच्या कामामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ झाली आहे. त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.