सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सीआयडीकडून परभणी पोलिसांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:58 IST2025-03-27T13:57:28+5:302025-03-27T13:58:51+5:30

सीआयडी पथकाकडून नानलपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणात पोलिसांचे जवाब तसेच चौकशी करण्यात आली.

CID questions Parbhani police in Somnath Suryavanshi death case | सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सीआयडीकडून परभणी पोलिसांची चौकशी

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सीआयडीकडून परभणी पोलिसांची चौकशी

परभणी : शहरात संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटनेनंतर अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षकांकडून परभणीतील पोलिसांची चौकशी बुधवारी करण्यात आली.

गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे परभणीमध्ये नानलपेठ पोलिस ठाणे येथे बुधवारी दाखल झाले होते. सीआयडी पथकाकडून नानलपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणात पोलिसांचे जवाब तसेच चौकशी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राज्य मानवाधिकार आयोगाकडे या प्रकरणात सुनावणी झाली होती. तसेच यापूर्वी न्यायमूर्ती आचलिया यांनी सुद्धा परभणीत भेट देऊन पाहणी केली होती. आता त्यानंतर सीआयडी पथकाकडून ही चौकशी प्राथमिक स्तरावर सुरू आहे. यामध्ये पुढे घटनाक्रम तसेच अन्य काही बाबींची चौकशी सुद्धा होणार असल्याचे समजते. त्यामुळे आता विविध चौकशी समिती, अहवाल, पथकांच्या भेटी, यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूर्यवंशी प्रकरणाने पोलिस दल हादरले
शहरात संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणानंतर दंगल उसळली. या दंगलीदरम्यान तोडफोडही झाली. यात अनेकांना अटक झाली होती. यातीलच एक असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा तुरुंगात असताना मृत्यू झाल्याने पुन्हा प्रकरण पेटले. आता याचा न्यायदंडाधिकारी चौकशी अहवाल सादर झाला अन् पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले. ७९ पोलिसांना नोटिसा देणार असल्याचे ऐकायला मिळत असल्याने पोलिस दलही हादरले आहे.

राज्य मानव अधिकार आयोगासमोर अहवाल
१५ डिसेंबर २०२४ रोजी पोलिस कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप केल्याने छत्रपती संभाजीनगर येथे शवविच्छेदन झाले. त्याचा प्राथमिक अहवाल व्हायरल झाला. मारहाणीत धक्का बसल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले होते. या प्रकरणात न्यायालयीन चौकशी झाली होती. शिवाय हा प्रश्न विधिमंडळात गाजल्यानंतर यात आचलिया समिती नेमली होती. या समितीनेही नुकतीच परभणीत येऊन चौकशी केली होती. पोलिस, घटनास्थळ व मयत सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची आचलिया यांनी भेट घेतली होती. तर त्यापूर्वी अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष व सदस्यांनी भेट दिली होती. त्यामुळे हे प्रकरण सातत्याने चर्चेत होते. मात्र यात कारवाई होत नसल्याचा आरोपच विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी केला होता. मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनेही या प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सातत्याने लावून धरली. शासनाची मदतही नाकारली. विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ यांना श्वसनाचा आजार असल्याचे म्हटले होते. त्यावरूनही हे कुटुंब नाराज होते. राज्य मानव अधिकार आयोगासमोर तब्बल ४५१ पानांचा न्यायदंडाधिकारीय अहवाल सादर केला आहे. यात सुनावणीही झाली. सूर्यवंशी कुटुंबीयांनीही येथे हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची व यात त्यांना मारहाण झाल्याचे म्हटले असल्याचे सांगितले जात आहे. हा अहवाल बाहेर आला नसला तरीही यामुळे पोलिस दलातील वातावरण तंगले आहे.

पोलिसांना शिक्षा व्हावी, सोमनाथच्या आईची मागणी
माझ्या मुलाचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असून पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयताची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी केली आहे. तर आयोगासमोरही त्यांनी आपली अशीच बाजू मांडली आहे. तर या पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली, असे त्या अजूनही सांगत आहेत.

महिनाभर आंदोलन अन् पुन्हा लाँगमार्च
परभणी येथील उपोषण मैदानावर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी जवळपास दीड महिना आंदोलन केले. सातत्याने पोलिसांवर कारवाईची मागणी लावून धरली. त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित विविध मागण्या घेऊन परभणी ते मुंबई लाँगमार्च काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी पाचारण करून त्यातील काही मागण्या मान्य केल्या होत्या. शिवाय काँग्रेसच्या वतीनेही आझाद मैदानावर आक्राेश मोर्चा काढण्यात आला होता.

Web Title: CID questions Parbhani police in Somnath Suryavanshi death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.