"मुख्यमंत्री खोटे बोलले", त्यांच्याविरुद्ध विशेषाधिकारी उल्लंघन प्रस्ताव आणू: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:28 IST2024-12-23T16:24:10+5:302024-12-23T16:28:13+5:30
परभणी, बीड प्रकरणात मुख्यमंत्री खोटे बोलले; त्यांच्या विरोधात विशेषाधिकारी उल्लंघन प्रस्ताव आणू

"मुख्यमंत्री खोटे बोलले", त्यांच्याविरुद्ध विशेषाधिकारी उल्लंघन प्रस्ताव आणू: नाना पटोले
परभणी: परभणी व बीड प्रकरणात वास्तविकता लपविण्याचे काम सरकार करीत आहे. आम्ही वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी आलो आहे. डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार सोमनाथला खूप मारहाण झाल्याने धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. मात्र यात मुख्यमंत्री खोटे बोलले. असेच बीड प्रकरणातही केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रिव्हिलेज मोशन आणू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पटोले पुढे म्हणाले, हा प्रश्न खा. राहुल गांधी संसदेत मांडून सरकारचे पितळ उघडे पाडतील. भाजपचे सरकार मागासवर्गीय, दलितांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठवू. मुख्यमंत्र्यांनीच परभणीतील ही घटना प्रायोजित केली होती काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. बीडच्या प्रकरणातही मुख्यमंत्री खोटे बोलले आहेत. विधानसभेची दिशाभूल केली आहे. पोलिसांना व आरोपींना वाचविण्याचे काम केले आहे, हे स्पष्ट झाले आहे. मंत्रिमंडळात ६५ टक्के मंत्री हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. गुन्हेगारांचे सरकार निर्माण झाले का? असा प्रश्न आहे. त्यामुळे जनता असुरक्षित आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.