१६०० चौरस फुट जागेत तांदळाने साकारली बाबासाहेबांची भव्य प्रतिमा; अभिवादनानंतर अन्नदान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 19:17 IST2025-12-06T19:15:23+5:302025-12-06T19:17:27+5:30
परभणीत कला आणि समाजसेवेचा अनोखा संगम; १६०० चौरस फुटांवर कलाकृती, गरजूंच्या पोटालाही दिला आधार!

१६०० चौरस फुट जागेत तांदळाने साकारली बाबासाहेबांची भव्य प्रतिमा; अभिवादनानंतर अन्नदान!
परभणी: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणी शहरात एक अत्यंत अभिनव आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला. विद्रोही फाउंडेशनने बिट्टू दातार यांच्या संकल्पनेतून चक्क तांदुळाचा वापर करून बाबासाहेबांची भव्य आणि आकर्षक प्रतिमा साकारली. ही कलाकृती केवळ अभिवादन नव्हते, तर त्यामागे अन्नदानाचा उदात्त सामाजिक उद्देश होता.
१६०० चौरस फुटांवर कलाकृती
शहरातील वांगी रोड भागातील ज्योतिर्गमयी शाळेसमोरील प्रांगणात ही अभूतपूर्व प्रतिमा साकारण्यात आली. कलाकार उद्देश पजळे यांनी आपल्या कलेतून या प्रतिमेला साकार रूप दिले. यासाठी तब्बल ३ क्विंटल ६९ किलो तांदूळ वापरण्यात आला. ही कलाकृती साधारण १६०० चौरस फूट इतक्या मोठ्या जागेवर साकारल्यामुळे, उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती आणि अनेकांनी या कलात्मक अभिवादनासमोर नतमस्तक होत आदराने वंदन केले.
जयभीमचा जयघोष, सोबत अन्नदान!
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) December 6, 2025
परभणीतील विद्रोही फाउंडेशनने ३ क्विंटल तांदळाने १६०० चौरस फुटांवर साकारली बाबासाहेब आंबेडकरांची भव्य प्रतिमा. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत अभिवादनानंतर फाउंडेशनने सर्व तांदूळ गरजूंना दान केले!#BabasahebAmbedkar#parabhanipic.twitter.com/tcoyVeuuEr
अभिवादन, मग अन्नदान
या अभिवादनाचे सर्वात महत्त्वाचे आणि भावनिक वैशिष्ट्य म्हणजे त्यामागे असलेला सामाजिक हेतू. या प्रतिमेसाठी वापरण्यात आलेला सर्व तांदूळ, महापरिनिर्वाण दिनानंतर गोरगरीब आणि गरजू लोकांना दान करण्यात येणार आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर उपेक्षितांसाठी आणि वंचितांसाठी लढा दिला. त्यांच्याच विचारांना अनुसरून, अभिवादनाची ही पद्धत निवडण्यात आल्याचे विद्रोही फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले. परभणीतील या अनोख्या कलाकृतीमुळे अभिवादन आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.