वीज गेल्याने लावलेला दिवा मांजराने पाडला; आगीत होरपळून पती-पत्नीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:16 IST2020-08-03T17:14:51+5:302020-08-03T17:16:48+5:30
कावलगाव येथे घडलेल्या या दुर्घटनेत दोघांचाही उपचारादरम्यान नांदेड येथे मृत्यू झाला.

वीज गेल्याने लावलेला दिवा मांजराने पाडला; आगीत होरपळून पती-पत्नीचा मृत्यू
पूर्णा (जि. परभणी) : वीजपुरवठा खंडित झाल्याने घरात पहाटेच्या वेळी लावलेला दिवा पत्नीच्या अंगावर पडल्याने तिला वाचविण्यासाठी गेलेला पतीही गंभीर भाजला.
कावलगाव येथे घडलेल्या या दुर्घटनेत दोघांचाही उपचारादरम्यान नांदेड येथे मृत्यू झाला. याप्रकरणी रविवारी चुडावा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. याबाबत चुडावा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कावलगाव येथील मुनवर खान मोहम्मद खान पठाण (२५) व त्याची पत्नी मैमुना मुनवर खान (२५) हे दोघे १९ जुलैच्या रात्री घरी झोपले होते.
मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे त्यांनी घरात रॉकेलचा दिवा लावला. पहाटेच्या सुमारास मांजराच्या धक्क्याने हा दिवा मैमुना मुनवर खान यांच्या अंगावर पडला. त्यामुळे त्यांच्या कपड्याने पेट घेतला. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे पती मुनवर खान मोहम्मद खान पठाण हे धावले. या घटनेत मैमुना खान या ८५ टक्के, तर त्यांचे पती मुनवर खान हे ६५ टक्के भाजले. त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना २३ जुलै रोजी मैमुना खान यांचा, तर २४ जुलै रोजी मुनवर खान यांचा मृत्यू झाला. शेख रोशन शेख खाजामियाँ यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण, जमादार केजगीर तपास करीत आहेत.