सॅल्यूट! जीवाची बाजी लावणाऱ्या कर्मचाऱ्यास बढती; पोलीस अधीक्षकांनी घरी जाऊन लावले 'स्टार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 14:03 IST2026-04-08T14:02:04+5:302026-04-08T14:03:03+5:30
रुग्णालयातून घरी परतताच पोलीस अधीक्षकांनी पदोन्नतीचे 'सरप्राईज' देत निलेश भुजबळांचा सन्मान केला

सॅल्यूट! जीवाची बाजी लावणाऱ्या कर्मचाऱ्यास बढती; पोलीस अधीक्षकांनी घरी जाऊन लावले 'स्टार'
- राजन मंगरूळकर
परभणी : दरोडेखोरांना पकडण्यास गेलेल्या स्थागुशा पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश भुजबळ हे १६ मार्चला रात्री आरोपीने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावल्याने या चोख कर्तव्याचा सन्मान पोलीस अधीक्षक यांनी कर्मचारी निलेश भुजबळ यांच्या घरी जाऊन केला.
पोलीस दलात सेवेचा नियत कालावधी पूर्ण केल्यानंतर मिळालेली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची पदोन्नती त्यांना अधिकाऱ्यांनी खांद्यावर स्टार लावून दिली. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्यासह कर्मचारी आणि भुजबळ कुटुंबीय उपस्थित होते.
परभणी जिल्हा पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बनलेले निलेश भुजबळ यांनी एकूण २४ वर्षे सेवा बजावली. या २४ वर्षाच्या सेवेत त्यांनी तब्बल ७४५ बक्षीस मिळविले. कोणतीही शिक्षा आजपर्यंत त्यांना सेवेच्या कालावधीत झालेली नाही. स्थागुशा पथक चारठाणा हद्दीत कारवाईला गेले असता आरोपीने निलेश भुजबळ याच्या पाठीत चाकूचे वार केले यात गंभीर जखमी झालेल्या भुजबळ यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे विशेष पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप सह पोलिस अधीक्षकांनी भुजबळ यांची भेट घेतली. आता वैद्यकीय रजेवर असताना त्यांना विहित सेवा पूर्ण केल्याने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली. या पदोन्नतीचे आगळे वेगळे गिफ्ट थेट पोलीस अधीक्षकांनी भुजबळ यांच्या घरी जाऊन कुटुंबा समवेत त्यांना खांद्यावर स्टार लावून बहाल केले.
आजचा दिवस माझ्यासाठी अभिमानाचा, अविस्मरणीय ठरला
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी मला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर मिळालेली पदोन्नती त्यांनी स्वतः माझ्या घरी येऊन, माझ्या कुटुंबीयांसमोर माझ्या खांद्यावर स्टार लावून मला सन्मानित केले. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात गौरवाचा, अविस्मरणीय ठरला.
- निलेश भुजबळ, सपोउपनि.