थरारक! धाडसी आईचा रुद्र अवतार; झेप घेत विषारी नागाच्या जबड्यातून लेकीला वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 20:03 IST2026-03-28T20:02:11+5:302026-03-28T20:03:07+5:30
आई म्हणजे काय असते? समोर फणा काढलेला जहाल नाग, पण पोटच्या गोळ्यासाठी या माऊलीने थेट नागावरूनच मारली उडी! जिंतूरमधील चित्तथरारक घटना.

थरारक! धाडसी आईचा रुद्र अवतार; झेप घेत विषारी नागाच्या जबड्यातून लेकीला वाचवले
- प्रशांत मुळी
येलदरी वसाहत (परभणी): "आईचं काळज ते आईचंच!" याची प्रचिती देणारी एक अंगावर शहारे आणणारी घटना जिंतूर तालुक्यातील येलदरी वसाहतीमध्ये घडली आहे. आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या दिशेने येणारा काळ पाहून, एका माऊलीने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता थेट फणा काढलेल्या नागाच्या अंगावरून उडी मारत लेकीचे प्राण वाचवले. मोनाली जाधव असे या धाडसी माऊलीचे नाव असून, त्यांनी आपल्या लेकीला मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोनाली जाधव यांच्या अचाट धैर्याचे कौतुक होत असून, "लेकरावर संकट आल्यावर आई वाघीण होते," हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
काळ समोर उभा असताना घेतला धाडसी निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, येलदरी वसाहतीमधील रहिवासी मोनाली रवी जाधव या शनिवारी सायंकाळी कामानिमित्त घराच्या मागच्या बाजूला आपली दोन वर्षांची मुलगी रेणुका हिला घेऊन गेल्या होत्या. त्याच वेळी दबा धरून बसलेला एक मोठा जहाल विषारी नाग अचानक रेणुकाच्या अगदी पायापाशी आला. समोर साक्षात मृत्यू उभा असल्याचे पाहून कोणाचीही गाळण उडाली असती, मात्र मोनाली यांनी क्षणार्धात निर्णय घेतला.
नागावरून उडी अन चिमुकली सुरक्षित
नाग रेणुकाच्या अंगावर झडप घालणार इतक्यात मोनाली यांनी विलक्षण चपळाईने चक्क त्या नागाच्या अंगावरून उडी घेतली आणि रेणुकाला अलगत आपल्या कवेत ओढले. आईच्या या साहसामुळे चिमुकल्या रेणुकाचे प्राण थोडक्यात वाचले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि शेजारी राहणारे प्रवीण मुळी यांनी तातडीने वन विभागाला पाचारण केले.
वन विभागाची मदत आणि नागाला जीवदान
घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाचे अधिकारी व्हि.बी. चाटसे आणि सर्पमित्र प्रमोद भालेराव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या शिताफीने त्या नागाला पकडले आणि सुरक्षितरीत्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. सध्या सोशल मीडियावर या 'धाडसी आई'चा व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.