वरपूडकरांना रोखण्यात बोर्डीकरांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:58 PM2018-05-16T12:58:18+5:302018-05-16T12:58:18+5:30

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी पाहिलेले स्वप्न भाजपाचे आ़ तान्हाजी मुटकुळे यांनी आक्षेप दाखल केल्याने भंग पावले असून, वरपूडकरांना रोखण्यासाठी बोर्डीकरांनी केलेली खेळी यशस्वी झाल्याचा प्रकार मंगळवारी जिल्हावासियांना अनुभवयास मिळाला. 

Bordikar successes in preventing warpudkar | वरपूडकरांना रोखण्यात बोर्डीकरांना यश

वरपूडकरांना रोखण्यात बोर्डीकरांना यश

Next
ठळक मुद्देर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पुरेपूर तयारी चालविली होती.गेल्या वेळी वरपूडकर व माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर हे एकाच पॅनलमधून निवडून आले होते़

परभणी : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी पाहिलेले स्वप्न भाजपाचे आ़ तान्हाजी मुटकुळे यांनी आक्षेप दाखल केल्याने भंग पावले असून, वरपूडकरांना रोखण्यासाठी बोर्डीकरांनी केलेली खेळी यशस्वी झाल्याचा प्रकार मंगळवारी जिल्हावासियांना अनुभवयास मिळाला. 

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची यापूर्वी निवडणूक जाहीर झाली होती; परंतु, आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या सदस्यत्वाच्या प्रकरणात ही निवडणूक पुढे ढकलली गेली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर १५ मे रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केला होता. त्यानुसार जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पुरेपूर तयारी चालविली होती. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांनी बँकेच्या बहुतांश संचालकांशी वैयक्तीकरित्या संपर्क साधला होता.  गेल्या वेळी वरपूडकर व माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर हे एकाच पॅनलमधून निवडून आले होते़;

परंतु, बोर्डीकर हे भाजपात गेले़. त्यानंतरही या दोन नेत्यांमध्ये काही काळ सख्य होते; परंतु, वरपूडकर यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक वाढल्याने वरपूडकर-बोर्डीकरांमध्ये दुरावा निर्माण झाला़ त्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या वरपूडकरांचा स्वप्नभंग करण्याची बोर्डीकरांनी पुरेपूर तयारी चालविली़. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय जामकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे केले़ नात्या-गोत्याच्या राजकारणात व पक्षीय पातळीवर चमत्कारीक बदल घडून वरपूडकरांना शह देता येईल, असा बोर्डीकर यांचा इरादा होता ; परंतु, वरपूडकर यांच्या सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ विजय भांबळे, आ़ मधुसूदन केंद्रे, कळमनुरीचे आ़ संतोष टारफे, वसमतचे माजी आ़ जयप्रकाश दांडेगावकर हे आले़. त्यामुळे वरपूडकरांची बाजू अधिक मजबुत झाली.

अध्यक्षपदाचे संख्याबळ जमविण्यात यश मिळत नसल्याने वरपूडकर यांना कायद्याच्या कचाट्यात पकडून त्यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्याची खेळी बोर्डीकर यांनी खेळली़. त्यांना हिंगोलीचे भाजपाचे आ़ तान्हाजी मुटकुळे यांची पुरेपूर साथ मिळाली़. सोमवारी आ़ मुटकुळे व बोर्डीकर यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून या विषयावर चर्चाही केली़. त्यानंतर वरपूडकर यांच्या अर्जावर आक्षेप घेण्याचा निर्णय झाला़ या व्युहरचनेनुसार मंगळवारी आ़ मुटकुळे- बोर्डीकर हे या प्रक्रियेला सामोरे गेले़. अध्यक्षपद मिळवायचेच या जिद्दीने वरपूडकर यांनीही संपूर्ण तयारी केली होती़. आक्षेप दाखल झाल्यास काय उत्तर द्यायचे, यासाठी त्यांनी औरंगाबादहून विशेष विधिज्ञांनाही पाचारण केले होते़. सकाळी ११़४५ पासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली़ वरपूडकर यांनी अध्यक्षपदासाठी तब्बल तीन उमेदवारी अर्ज दाखल केले़. ऐनवेळी त्यांचा अर्ज बाद झालाच तर आपल्या गटाच्या एका समर्थकाचा अर्ज कायम रहावा, म्हणून त्यांनी बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष पंडितराव चोखट यांचाही अर्ज दाखल केला. दुसरीकडे बोर्डीकर गटाचे विजय जामकर यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.

अपेक्षेप्रमाणे वरपूडकर यांच्या अर्जावर भाजपाचे आ़ मुटकुळे यांनी आक्षेप दाखल केला. त्यामध्ये वरपूडकर हे प्रक्रिया मतदार संघातून निवडून आले आहेत़, या मतदार संघातून निवडून आलेल्या सदस्याला जिल्हा बँकेचे अध्यक्षपद किंवा उपाध्यक्षपद मिळविता येत नाही़. त्यामुळे वरपूडकरांचा अर्ज बाद करावा, अशी मागणी मुटकुळे यांनी केली़. त्यानंतर महाराष्ट्र सहकार अधिनियम ७३ (ड) नुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी वरपूडकर यांचा अर्ज बाद ठरविला. त्यानंतर हात उंचावून घेण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या मतदानात अपेक्षेप्रमाणे चोखट यांना ११ मते मिळाली तर बोर्डीकर गटाचे उमेदवार जामकर यांना ६ मते मिळाली़ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चोखट यांना ५ मतांनी विजयी घोषित केले़. निवडणूक निकालानंतर आपल्या गटाचा उमेदवार जिंकल्याचा वरपूडकर यांना आनंद होता़ ; परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षपदाचे पाहिलेली स्वप्न भंग झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील  नाराजी लपत नव्हती़. गेल्या ३५ वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या वरपूडकर- बोर्डीकर या दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेल्या या अस्तित्वाच्या लढाईत काही अंशी बोर्डीकर जिंकले; परंतु बँकेवरील ताबा त्यांनी गमावला. तर वरपूडकर जिंकूनही अध्यक्ष न झाल्याने विजयाचा आनंद साजरा करू शकले नाहीत. 


बोर्डीकर यांच्यावर  चिंतनाची वेळ

रामप्रसाद बोर्डीकर यांचे जिल्हा बँकेवर गेल्या १५ वर्षांपासून वर्चस्व होते़. तीन वर्षापूर्वी त्यांनी माजी मंत्री वरपूडकर यांच्यासोबत पॅनल तयार करून बँकेवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळविले होते़. त्यानंतर त्यांनी आपल्या मर्जीतील कुंडलिकराव नागरे यांची अध्यक्षपदासाठी निवड केली़. या तीन वर्षांच्या कालावधीत त्यांच्याच पॅनलमधील अनेक सदस्यांशी त्यांचा संवाद राहिला नाही़. शिवाय त्यांनी पक्षांतरही केले़ त्यामुळे सदस्यांसोबत दुरावा निर्माण झाला. या निवडणुकीत त्यांनी वरपूडकर यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवले असले तरी बँकेवरील सत्ता मात्र गमवावी लागली आहे़. त्यामुळे त्यांच्यापासून सदस्य का दुरावले याविषयी त्यांना चिंतन करावे लागणार आहे़. 


आडळकर वरपूडकर गटाकडे तर दुधाटे तटस्थ

सेलू येथील हेमंतराव आडळकर हे एकेकाळी माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक होते़. या निवडणुकीत मात्र त्यांनी वरपूडकर यांना साथ दिली़. यासाठी राष्ट्रवादीचे आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. बँकेचे संचालक लक्ष्मणराव दुधाटे गोळेगावकर यांनी मात्र कोणालाही मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका पार पाडली़. 


चोखट यांचे अचानक नाव आले पुढे

मानवत तालुक्यातून निवडून आलेले जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पंडितराव चोखट यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येईल, असे कोणालाही वाटले नव्हते़. सोमवारपासून वरपूडकर यांच्या अर्जावर आक्षेप घेतला जाईल, अशी चर्चा सुरू होती़. त्यामुळे किमान आपला समर्थक तरी अध्यक्षपदी विराजमान व्हावा, असे वरपूडकर यांना वाटत होते़. त्यानुसार इतर एक-दोन नावांची चर्चा होती़; परंतु, त्यात चोखट यांच्या नावाचा समावेश नव्हता. मंगळवारी निवडणूक प्रक्रियेच्या वेळी अचानक घडलेल्या घडामोडीत समतोल राखून असलेले चोखट यांचे नाव अचानक पुढे आले व त्यांच्या नावाला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पसंती देत शिक्कामोर्तब केले़. 


... या सदस्यांनी केले चोखट यांना मतदान

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले पंडितराव चोखट यांना सुरेश वरपूडकर, सुरेश देशमुख, अंबादास भोसले, अ‍ॅड़ बाबा नाईक, हेमंतराव आडळकर, पंडितराव चोखट, करुणाबाई कुंडगीर, द्वारकाबाई कांबळे, सुरेश वडगावकर, बालाजी देसाई, राजेश विटेकर या ११ सदस्यांची मते मिळाली. 


...यांनी केले जामकर यांना मतदान

बोर्डीकर गटाकडून अध्यक्षपदाची निवडूक लढविलेले विजय जामकर यांना आ़ तान्हाजी मुटकुळे, साहेबराव पाटील गोरेगावकर, रुपाली राजेश पाटील गोरेगावकर, विजय जामकर, भगवान सानप व प्रभाकर वाघीकर यांनी मतदान केले़. 


विटेकर यांनी नात्यापेक्षा पक्ष नेत्यांच्या आदेशाला दिले महत्त्व

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जि़. प. अध्यक्ष राजेश विटेकर यांची या निवडणुकीत सर्वाधिक गोची झाली होती़. विटेकर हे तीन वर्षांपूर्वी दुर्राणी-भांबळे-देशमुख गटाच्या पॅनलमधून निवडून आले होते़; परंतु, नंतर ते बोर्डीकर यांच्या पॅनलमध्ये गेले़. बोर्डीकर गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार विजय जामकर हे विटेकर यांचे नातेवाईक आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारपासून विटेकर यांना आघाडीचा धर्म पाळत वरपूडकर यांना मतदान करण्याचा आदेश दिला होता.  त्यामुळे अडचणीत सापडलेल्या विटेकर यांनी शेवटी नात्यागोत्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला महत्त्व देत वरपूडकर गटाचे उमेदवार पंडितराव चोखट यांच्या पारड्यात आपले मत टाकले. 

Web Title: Bordikar successes in preventing warpudkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.