परभणी : कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची राख आणि अस्थी नेण्यास काही नातेवाईक धजावत नसल्याने स्मशानभूमी परिसरात जमा झालेली ही राख स्मशानजोगींनाच नदीपात्रात विसर्जित करावी लागत आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाने मृत्यूचे प्रमाण अद्याप घटले नाही. कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर काही जण भीतीपोटी तर काही जण काळजीपोटी राख आणि अस्थी नेण्यासाठी पुढे येत नसल्याचे प्रकार घडले आहेत. मागील महिन्यात सरासरी १५ ते २० जणांचे मृत्यू कोरोनाने होत होते. त्यापैकी एक ते दोन मयतांचे नातेवाईक राख नेण्यासाठी आले नसल्याचे स्मशानजोगींनी सांगितले.
परभणी शहरात जिंतूर येथील अमरधाम स्मशानभूमी, खंडोबा बाजार येथील स्मशानभूमी आणि खानापूर येथील स्मशानभूमीत कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जातात. जिंतूर रोडवरील अमरधाम स्मशानभूमीत सर्वाधिक अंत्यसंस्कार होतात. या ठिकाणी राख शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. तर खंडोबा बाजार येथील स्मशानभूमीतही राख शिल्लक असून, काही दिवस ही राख ठेवून त्याची विल्हेवाट लावली जाणार असल्याचे सांगण्यात आले. एकंदर दोन्ही स्मशानभूमीत शिल्लक राखेचा प्रश्न आहे.
परवानगीने अस्थींचे विसर्जन
जिंतूर रोड भागातील अमरधाम स्मशानभूमीत मागील महिन्यात काही जणांच्या अस्थी आणि राख शिल्लक राहिली होती.
अशा वेळी नातेवाईकांना फोन करुन त्यांना अस्थी व राखेविषयी विचारल्यानंतर त्यांनी परवानगी दिल्यानंतर नदीपात्रात विसर्जन केले जाते.
शिल्लक राहिलेली राख व अस्थी नातेवाईकांच्या परवानगीनंतर टेम्पोने नदीपात्र परिसरात नेऊन विसर्जित करावी लागते.
जिंतूर रोड स्मशानभूमी
येथील जिंतूर रोड भागातील स्मशानभूमीस भेट दिली तेव्हा थोड्या फार प्रमाणात राख शिल्लक असल्याचे दिसून आले. मागील महिन्यात अंत्यसंस्काराचे प्रमाण अधिक होते. मात्र आता हे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राखेचा प्रश्न नसल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीला या ठिकाणी दररोज होणाऱ्या अंत्यसंस्काराच्याच अस्थी, राख शिल्लक आहे.
खंडोबा बाजार स्मशानभूमी
खंडोबा बाजार येथील स्मशानभूमीत काही प्रमाणात राख शिल्लक आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईक उशिराने येत आहेत. संचारबंदीमुळे वाहतुकीचा प्रश्न असल्यानेही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राख आणि अस्थी जपून ठेवाव्या लागतात. संचारबंदीमुळेच शिल्लक राखेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या स्मशानभूमीतही शिल्लक राखेचा प्रश्न आहे.
खानापूर स्मशानभूमी
येथील खानापूर भागातील स्मशानभूमीला भेट दिली तेव्हा शिल्लक राखेचा प्रश्न नसल्याचे सांगण्यात आले. या स्मशानभूमीत कोरोनाबाधित मयत रुग्णांवर अंत्यसंस्कार होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईक तिसऱ्या दिवशी स्मशानभूमीत येऊन राख व अस्थी घेऊन जातात. त्यामुळे राखेचा प्रश्न नाही.
कोरोनाच्या भीतीमुळे काही जण अस्थी व राख संकलनासाठी आले नाहीत. तसेच काहींनी कमी प्रमाणात राख नेली. सध्या मात्र अशी परिस्थिती नाही. मात्र शिल्लक राख व अस्थी नातेवाईकांशी संपर्क करुन नदीपात्रात विसर्जित करावी लागते.
- शंकर भंडारे,
खंडोबा बाजार येथील स्मशानभूमीत काही प्रमाणात राख शिल्लक आहे. सध्या ती एका बाजूला साठवून ठेवली आहे. संचारबंदीमुळे नागरिक, नातेवाईकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिल्लक राखेचा प्रश्न आहे.
- लक्ष्मण भंडारे
खानापूर फाटा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी नातेवाईक राख व अस्थी घेऊन जातात. त्यामुळे या स्मशानभूमीत राख, अस्थी शिल्लक नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर नेहमी प्रमाणेच प्रक्रिया होत आहे.
- अंकुश जाधव