परभणीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे भाजी-भाकरी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 15:43 IST2018-12-04T15:41:56+5:302018-12-04T15:43:48+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येऊन भाजी-भाकरी आंदोलन केले़

परभणीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे भाजी-भाकरी आंदोलन
परभणी : गंगाखेड शुगर कारखान्याने ऊस बिलाची थकीत रक्कम तत्काळ अदा करावी, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येऊन भाजी-भाकरी आंदोलन केले़ या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधले होते़
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील ऊस गंगाखेड साखर कारखान्याने मागील वर्षी नेला़ २२०० रुपये प्रतिटन या प्रमाणे भाव दिला जाईल, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले़ प्रत्यक्षात केवळ दीड हजार रुपयांप्रमाणे बिले दिली़ शासनाच्या निर्णयानुसार १४ दिवसांच्या आत एक रकमी एफआरपी देणे आवश्यक असताना तब्बल एक वर्ष उलटूनही पैसे दिले नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत़ तसेच या कारखान्याने ऊस बिलातून तोडणी व वाहतूक भाडेही कपात केले आहे़ तेव्हा जाहीर केल्या प्रमाणे ऊस बिलातील राहिलेली रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले़ आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वत: आणलेली भाजी-भाकरी रांगेत बसून खालली़
या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रल्हाद इंगोले, दिगंबर पवार, दीपक भालेराव, केशव आरमळ, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लोंढे, राजू शिंदे, माऊली लंगोटे, बालाजी लोखंडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते़