सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू; ‘त्या’ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे खंडपीठाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:24 IST2025-07-05T18:15:32+5:302025-07-05T18:24:12+5:30

सोमनाथच्या आई विजयाताई यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यांच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला.

Bench orders to register a case against ‘those’ policemen in the custodial death case of Parbhani Somnath Suryavanshi | सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू; ‘त्या’ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे खंडपीठाचे आदेश

सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू; ‘त्या’ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे खंडपीठाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : परभणी येथील न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजयाताई सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधात ८ दिवसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी परभणी येथील मोंढा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना शुक्रवारी दिले.

पुढील कार्यवाहीसाठी नियमावली ठरविण्याची गरज
सोमनाथच्या आई विजयाताई यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यांच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात तपास यंत्रणांनी १७९ कलमान्वये बजावलेल्या नोटीस बेकायदेशीर आहेत. तपासी अधिकारी व गुन्ह्यातील आरोपी हे सारखेच आहेत. नोटिसीतील मजकूर दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) पोलिसांवरच दाखल झाला पाहिजे. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १९६ नुसार कोठडीतील मृत्यूची चौकशी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी करतात. मात्र, त्यानंतरची कायदेशीर पावले कोणती, हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे अशा प्रकरणांत पुढील कार्यवाहीसाठी नियमावली ठरविण्याची गरज आहे, असे त्यांनी सुचवले. त्याचप्रमाणे, राज्य सरकारने तपासासाठी सीआयडी नियुक्ती केली असली तरी ती रद्द करून न्यायालयाच्या अधीन राहणारी विशेष तपास समिती (एसआयटी) नेमण्याची मागणीही त्यांनी केली होती.

या प्रकरणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांना ॲड. मिलिंद संदानशिव, ॲड. सिद्धार्थ शिंदे, ॲड. प्रफुल्ल पिंपळगावकर, ॲड. डी. एन. गिलचे, ॲड. राहुल सोनवणे आणि ॲड. कोमल शिंदे यांचे सहकार्य लाभले.

उपअधीक्षक करणार तपास
या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षकपदाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचे निर्देश खंडपीठाने परभणीच्या एस. पीं.ना दिले आहेत. या कोठडीतील मृत्यू प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये तब्बल ७२ पोलिस कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे. याचिकेतील इतर विनंत्यांसंदर्भात ३० जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत विचार करण्यात येणार आहे.

घटनेची पार्श्वभूमी
सोमनाथला परभणीत संविधान प्रतिकृतीच्या अपमानानंतर उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे नमूद करून त्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.

Web Title: Bench orders to register a case against ‘those’ policemen in the custodial death case of Parbhani Somnath Suryavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.