सावधान ! पिंगळगड नाल्यावरील निर्माणाधीन पुल खचतोय, जड वाहनांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 12:19 IST2021-06-14T12:18:32+5:302021-06-14T12:19:42+5:30
शहराजवळील गंगाखेडरोडवर असलेल्या पिंगळगड नाल्यावर नव्या पुलाचे काम चालू आहे.

सावधान ! पिंगळगड नाल्यावरील निर्माणाधीन पुल खचतोय, जड वाहनांना बंदी
परभणी : शहरात रविवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे पिंगळगड नाल्याला पूर आला आहे. पुरात पर्यायी रस्ता वाहून गेला असून निर्माणाधीन पुलावरून वाहतूक सुरु केल्याने तो खचत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पोलिसांनी हा पूल जड वाहतुकीस बंद केला आहे.
शहराजवळील गंगाखेडरोडवर असलेल्या पिंगळगड नाल्यावर नव्या पुलाचे काम चालू आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र रविवारी झालेल्या जोरदार पावसाने पूर आल्याने पर्यायी रस्ता वाहून गेला. दरम्यान, नवीन पुलाचे काम चालू आहे. चार दिवसापूर्वीच पुलावर स्लॅब टाकला आहे.
मात्र, काही वाहनचालकांनी त्यावरूनच वाहतूक चालू केली. जड वाहने सुद्धा यावरून जात असल्याने पूल खचत असल्याची बाब निदर्शनास आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ पुलावरून जड वाहतुकीस बंदी केली. या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला असून पोलीस वाहतूक नियोजन करत आहेत.