सतर्क रहा! परभणी जिल्ह्यात उष्णतेचा कहर; तापमानाने गाठला ४३ अंशांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 12:34 IST2025-04-23T12:33:53+5:302025-04-23T12:34:30+5:30

आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे आवाहन, उष्माघात झाल्यास असे करा उपाय

Be alert! Heatwave wreaks havoc in Parbhani district; Temperature reaches 43 degrees | सतर्क रहा! परभणी जिल्ह्यात उष्णतेचा कहर; तापमानाने गाठला ४३ अंशांचा टप्पा

सतर्क रहा! परभणी जिल्ह्यात उष्णतेचा कहर; तापमानाने गाठला ४३ अंशांचा टप्पा

परभणी : जिल्ह्यात उष्णतेने कहर केला असून, मंगळवारी शहराचे तापमान तब्बल ४३ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक असून, नागरिकांना उन्हाचा तडाखा बसत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा आरोग्य विभागाने या पार्श्वभूमीवर उष्माघात व उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी विविध सूचना जारी केल्या आहेत.

उष्णतेपासून संरक्षणासाठी खबरदारी घ्यावी, शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्यावे. प्रवास करताना पाण्याची बाटली, ओआरएस, ताक, लिंबूपाणी, लस्सी, फळांचे रस सोबत ठेवावे. हलक्या रंगाचे, पातळ सुती कपडे वापरावेत. डोके झाकण्यासाठी टोपी, छत्री यांचा वापर करावा. सूर्यप्रकाशात जाताना चप्पल किंवा बूट घालणे आवश्यक आहे. उन्हात जास्त वेळ राहणे टाळा; शक्यतो हवेशीर व थंड ठिकाणी वेळ घालवा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

घरात आणि घराबाहेर…
घराच्या सूर्यप्रकाशाच्या बाजूच्या खिडक्या दिवसा बंद ठेवाव्यात व थंड हवा येण्यासाठी संध्याकाळी उघडाव्यात. सकाळी आणि संध्याकाळीच घराबाहेरील कामांचे नियोजन करावे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघडाव्यात.

उष्माघात झाल्यास त्वरित साधा संपर्क
मंगळवारी शहराचे तापमान तब्बल ४३ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. त्यामुळे उष्माघात झाल्यास त्वरित ओल्या कपड्याने शरीर पुसावे, थंड सावलीत ठेवावे. लगेच १०८ किंवा १०२ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. रुग्णाला शक्य तितक्या लवकर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे यांनी केले आहे.

Web Title: Be alert! Heatwave wreaks havoc in Parbhani district; Temperature reaches 43 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.