बालरोगतज्ज्ञांच्या अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST2021-05-25T04:20:11+5:302021-05-25T04:20:11+5:30

परभणी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर उपचार करण्यासाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय साधनांची माहिती एकत्रित करण्यासाठी स्थापन केलेल्या बालरोगतज्ज्ञ ...

Awaiting the report of the pediatrician to the administration | बालरोगतज्ज्ञांच्या अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा

बालरोगतज्ज्ञांच्या अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा

परभणी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर उपचार करण्यासाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय साधनांची माहिती एकत्रित करण्यासाठी स्थापन केलेल्या बालरोगतज्ज्ञ यांच्या समितीच्या अहवालाची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा लागली आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर औषधी आणि वैद्यकीय साधनांचा पुरवठा नोंदविला जाणार आहे.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविल्यानंतर लहान मुलांवर उपचार करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. कोरोनाबाधित वयस्क रुग्ण आणि कोरोनाबाधित लहान मुले यांच्यातील उपचारांमध्ये मोठा फरक आहे. लहान मुलांना वापरले जाणारे व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचे व्हॉल्व्ह वेगळे असतात. त्यामुळे लहान मुलांसाठी किती व्हेंटिलेटर लागतील, किती ऑक्सिजन व्हॉल्व्ह लागतील, याविषयीची माहिती संकलित केली जात आहे. याशिवाय, कोरोनाबाधित लहान मुलांना कोणत्या प्रकारची औषधे द्यावी लागणार आहे, या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञ यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या उपस्थितीत या समितीची स्थापना करण्यात आली. अद्याप समितीचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला नाही. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार वैद्यकीय साधने आणि औषधीची मागणी राज्याच्या आरोग्य विभागाकडे नोंदविली जाणार आहे. सध्या तरी जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्याची तयारी सुरू आहे.

१० लाख लोकसंख्येला लागणार ३० एनआयसीयू खाटा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर उपचार करण्यासाठी साधारणतः १० लाख लोकसंख्येमागे ३० एनआयसीयू खाटांची आवश्यकता भासेल, असा अंदाज आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २० लाखांच्या आसपास असून सुमारे ६० एनआयसीयू खाटा जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारल्या जाणार आहेत.

त्याचप्रमाणे जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या एकूण प्रसूतीच्या ५ टक्के खाटा कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागू शकतात, अशी शक्यता गृहीत धरली, तर ६० खाटांची आवश्यकता भासणार आहे. असे एकंदर १०० खाटांचे एनआयसीयू उभारण्याची तयारी आरोग्य विभागाने केली आहे.

उपचारांसाठी दोन विभाग

कोरोनाच्या तिस-या लाटेत लहान मुलांवर उपचार करण्यासाठी नवजात शिशू विभाग आणि बालरोग विभाग असे दोन स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

९० टक्के बालकांवर घरीच उपचार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बाधित होणाऱ्या ९० टक्के बालकांवर घरीच उपचार होऊ शकतात. लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे सातत्याने जाणवतात. नेहमीच अशा प्रकारची लक्षणे जाणवल्याने मुलांमध्ये प्रतिकारक्षमता वाढलेली असते. त्यामुळे ९० टक्के बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासणार नाही, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली. उर्वरित १० टक्के बालकांच्या उपचारांची तयारी केली जात आहे.

परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांसाठी अतिदक्षता विभागात ५० खाटा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. कालच त्याचा आढावा घेतला होता. तेव्हा बालरोग विभाग सुरू नव्हता. लवकरच हा विभाग सुरू करण्याचे सांगितले आहे. लवकरच कार्यान्वित होईल.

दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी

Web Title: Awaiting the report of the pediatrician to the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.