ऑडिओ क्लिप व्हायरल तरी घेतली लाच; जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे रंगेहाथ पकडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 18:10 IST2025-03-28T18:06:31+5:302025-03-28T18:10:02+5:30
यासोबतच ५० हजारांची दलाली करणारा क्रीडा अधिकारीही एसीबीच्या गळाला लागला आहे

ऑडिओ क्लिप व्हायरल तरी घेतली लाच; जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे रंगेहाथ पकडल्या
परभणी : २०२४ मध्ये घेतलेल्या क्रीडा स्पर्धांसह क्रीडा अकॅडमीच्या जागेवर उभारलेल्या स्विमिंग पुलाच्या बांधकामाचे देयक काढण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता सुभाष नावंदे, क्रीडा अधिकारी नानकसिंग महासिंग बस्सी या दोघांनी अडीच लाखांची लाच मागितली होती. यातील एक लाख आधीच दिल्यानंतर आज दीड लाखाची लाच स्वीकारताना कार्यालयातच रंगेहाथ पकडले आहे.
यातील तक्रारदाराने २०२४ मध्ये घेतलेल्या क्रीडा स्पर्धांचे ५ लाख, तर क्रीडा अकॅडमीच्या जागेवरील स्विमिंग पुलाचे ९० लाखांचे देयक नावंदे यांच्या कार्यालयात प्रलंबित होते. ते काढण्यासाठी ३ मार्च २०२५ रोजी तक्रारदार कविता नावंदे व बस्सी यांना भेटले. तेव्हा नावंदे यांनी स्वतःसाठी दोन लाख तर बस्सींसाठी ५० हजार असे अडीच लाख मागितले. देयकात त्रुटी काढण्याच्या भीतीने १३ मार्चला तक्रारदाराने १ लाख नावंदे यांना दिले. मात्र लाचेची उर्वरित रक्कम देण्याची इच्छा नसल्याने २४ मार्चला परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली.
याच दिवशी तक्रारीची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला तर दोघेही भेटले नाही. २५ रोजी नावंदे यांची भेट झाली, तर त्यांनी बस्सी सर येतील, ते करून टाका, असे म्हणत लाच स्वीकारण्याची सहमती दर्शविली. त्यावरून पंचासमक्ष सापळा रचला. २७ रोजी बस्सी यांनी स्वत:साठी ५० हजार व नावंदे यांच्यासाठी १ लाखांची लाच मागितली. ती स्वीकारण्याची तयारी दर्शवून नावंदे यांच्या दालनात नेले. तेथे त्या दोघांनीही लाच स्वीकारली. या दोघांनाही ताब्यात घेऊन नवा मोंढा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंगझडतीत आढळली जास्तीची रक्कम
आरोपी कविता नावंदे यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्या पर्समध्ये लाचेची रक्कम एक लाख रुपये व अधिकचे सहा हजार तसेच एक मोबाइल आढळला. तर नानकसिंग बस्सीच्या अंगझडतीत लाचेची रक्कम ५० हजार रुपये व त्याव्यतिरिक्त रोख रक्कम १८५० रुपये आणि मोबाइल फोन आढळला.
घरझडतीतही आढळले १ लाख ५ हजार
कविता नावंदे यांच्या परभणीस्थित निवासस्थानाची झडती घेतली असता १ लाख ५ हजार रुपये रोख मिळाले आहेत. या झडतीचे छायाचित्रणही केले आहे, तर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील घराची झडती कार्यवाही सुरू आहे. बस्सी यांच्या नांदेड येथील घराची घरझडती सुरू आहे.
कविता नावंदे दोनदा निलंबित
कविता नावंदे यांच्याविरोधात अहिल्यानगर येथे २०२० मध्ये मोठे आंदोलन झाल्याने त्यांची बदली झाली होती. छत्रपती संभाजीनगर येथेही त्या एकदा निलंबित झाल्या होत्या, तर त्यापूर्वी एकदा निलंबित झाल्याचे क्रीडा विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यांचा कार्यकाळ बऱ्याच ठिकाणी वादग्रस्तच ठरला आहे.
ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल
मागील आठवड्यात नावंदे यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यालाच क्रीडा स्पर्धेचे बिल काढण्यासाठी ८० हजारांची मागणी केल्याची क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्येही दलाली करणाऱ्या बस्सीचे नाव समोर आले होते.
विधिमंडळातही गाजला मुद्दा
परभणीचे आ. राहुल पाटील, पाथरीचे आ.राजेश विटेकर यांनी नावंदे यांच्याविरोधात विधिमंडळातही आवाज उठविला होता. नावंदे यांच्या लाचखोरीमुळे क्रीडाक्षेत्राची पुरती वाट लागल्याचा आरोप त्यांनी केला होता. अखेर नावंदे लाचखोरीत किती बुडाल्या, हे या प्रकरणातूनच समोर आले आहे.
बस्सीवर लाचखोरीचा आधीच एक गुन्हा
क्रीडा अधिकारी नानकसिंग महासिंग बस्सी याच्याविरुद्ध २०१७ मधील एका प्रकरणात लाच घेतल्याचा गुन्हा बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल आहे. गु. र. नं. ५३४/२०१७ हा गुन्हा दाखल असून, तो न्यायप्रविष्ट आहे.
मोबाइल तपासणार
आरोपी नानकसिंग बस्सी आणि कविता नावंदे यांचे मोबाइल ताब्यात घेण्यात आले असून, पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले.