प्रशासनाच्या सर्वेक्षणातून २ हजार रुग्ण शोधण्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST2021-05-22T04:16:38+5:302021-05-22T04:16:38+5:30
परभणी : दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागात ३ लाख २६ हजार ९८ घरांची तपासणी केली. तेव्हा ...

प्रशासनाच्या सर्वेक्षणातून २ हजार रुग्ण शोधण्यास मदत
परभणी : दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागात ३ लाख २६ हजार ९८ घरांची तपासणी केली. तेव्हा ९ हजार ८ संशयित रुग्ण आढळले. या रुग्णांच्या कोरेाना तपासणीत २ हजार २९४ जणांना कोरोना असल्याची बाब पुढे आली. सर्वेक्षणातून शोधलेल्या या रुग्णांमुळे ग्रामीण भागात कोरोना रुग्णांवर उपचार करणे सोयीचे झाले आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला. सुरुवातीला शहरी भागात असलेला कोरोनाचा संसर्ग पुढे ग्रामीण भागातही पसरला. मात्र, हा संसर्ग ग्रामीण भागात वाढल्यानंतरही अनेक रुग्ण सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार अंगावर काढत होते. त्यामुळे कोरेानाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला मोठ्या उपाययोजना कराव्या लागल्या. हा संसर्ग अधिक वाढवू नये यासाठी ८ ते ११ मे या काळात घराघरी जाऊन संशयित रुग्ण शोधण्याची मोहीम राबविण्यात आली. यात शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेतला. जिल्ह्यातील ३ लाख २६ हजार ९८ घरांना कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन या घरातील नागरिकांच्या प्रकृतीची नोंद घेतली. तेव्हा ९ हजार ८ जणांना सर्दी, खोकलाप, ताप यासारखी लक्षणे असल्याचे पुढे आले. विशेष म्हणजे या संशयित रुग्णांमध्ये ८ हजार ७२२ संशयित रुग्ण ग्रामीण भागातील आढळले, तर मनपाच्या हद्दीत २७७ आणि नगर पालिकेच्या हद्दीत ९ संशयित रुग्णांची नोंद घेण्यात आली.
सर्वेक्षणात आढळलेले ९ हजार ८ संशयित आजारी असतानाही कोरोनाची तपासणी करीत नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे या संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २ हजार २९४ जणांना कोरेानाचा संसर्ग झाल्याची बाब स्पष्ट झाली. त्यामुळे या रुग्णांवर योग्य उपचार करण्यासही मदत झाली.
जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये लक्षणे असतानाही तपासणी होत नसल्याचेच सर्वेक्षणातून पुढे आले आहे. सर्वेक्षणात २ हजार रुग्णांची नोंद झाल्याने या रुग्णांना संदर्भ सेवा देऊन कोरोनावर उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील हा संसर्ग थांबविण्यासाठी एक प्रकारे मदतच झाली आहे.
परभणी शहरात ३९ हजार घरांची तपासणी
ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही प्रशासनाने या काळात सर्वेक्षण केले. एकूण ३९ हजार ९४५ घरांना भेटी देण्यात आल्या. त्यात २७७ जणांना सर्दी, खोकला यासारखी लक्षणे आढळले असून त्यापैकी २६२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ४८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे शहरी भागात लक्षणे असतानाही कोरोना तपासणी करणे टाळले जात असल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागातील सर्वेक्षणाचा लेखाजोखा
ग्रामीण भाग
२लाख ३९ हजार घरांना भेटी
८ हजार ७२२ संशयितांची नोंद
तपासणीअंती २ हजार १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह