जिंतूररोड ते दर्गा रस्त्याच्या कामाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST2021-05-25T04:20:16+5:302021-05-25T04:20:16+5:30
परभणी : मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत जिंतूररोड ते दर्गा या ३ कोटी ९४ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाला २४ मे ...

जिंतूररोड ते दर्गा रस्त्याच्या कामाला मंजुरी
परभणी : मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत
जिंतूररोड ते दर्गा या ३ कोटी ९४ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाला २४ मे रोजी झालेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.
महापालिकेची स्थायी समितीची सभा सोमवारी सभापती गुलमीर खान यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने पार पडली. उपायुक्त देविदास जाधव, उपायुक्त प्रदीप जगताप, नगरसचिव विकास रत्नपारखे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी खासदार राजीवजी सातव, तसेच कोविडने मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मूलभूत सोयीसुविधा विकास योजनेअंतर्गत जिंतूर रोड ते दर्गा रोड या रस्त्याच्या कामाचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला. रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे, चांगली एजन्सीमार्फतच हे काम व्हावे, अशी अपेक्षा नगरसेवक बाळासाहेब बुलबुले, सचिन अंबिलवादे, अमोल पाथरीकर यांनी व्यक्त केली. प्रभाग क्रमांक १० अंतर्गत जिंतूर रोड, रायगड कॉर्नरपासून ते दर्गापर्यंत डांबरीकरण रस्ता व दोन्ही बाजूने नाली बांधकाम करणे या कामासाठी अंदाजित ३ कोटी ९७ लाख ९३ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. या कामास सभागृहात मंजुरी देण्यात आली. तसेच ८ कोटी ८१ हजार ६०० रुपये खर्चाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान समूह केंद्राच्या बांधकामासही मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील शौचालयाचे सेफ्टी टँकमध्ये मैल्याचे संकलन करणे व बोरवंड येथील मलनिःसारण प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करण्यासाठी दर निश्चिती, अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामाच्या निविदा दरास मंजुरी, रविराज पार्क येथील मोकळ्या जागेत विपश्यना केंद्र बांधणे, प्रभाग ६, प्रभाग ७ मध्ये पेव्हर रस्त्यांची कामे, मनपातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदत वाढ, आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.
या सभेदरम्यान, नगरसेवक बाळासाहेब बुलबुले, सचिन अंबिलवादे, अमोल पाथरीकर, नाजमीन पठाण, आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला. सहायक आयुक्त महेश गायकवाड, अभियंता तन्वीर मिर्झा बेग, शहर अभियंता वसीम पठाण, आदींची उपस्थिती होती.
उद्यानांचे कंत्राट देण्यास मंजुरी
राजगोपालाचारी उद्यान व नेहरू उद्यांनाची देखभाल दुरुस्ती व स्वच्छता ठेवण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर एजन्सी नियुक्त करण्यास या सभेत मंजुरी देण्यात आली. सात वर्षांसाठीचा एजन्सीमार्फत उद्यान चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती उद्यान अधीक्षक पवन देशमुख यांनी दिली.