आंबेडकरी अनुयायांचा मोठा आधारवड हरपला; पँथर विजय वाकोडे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:22 IST2024-12-17T12:21:52+5:302024-12-17T12:22:24+5:30
विजय वाकोडे यांचे महाविद्यालयीन जीवनापासून आंबेडकरी चळवळीशी अतूट नाते होते.

आंबेडकरी अनुयायांचा मोठा आधारवड हरपला; पँथर विजय वाकोडे यांचे निधन
परभणी : दलित चळवळीचे प्रमुख नेते तथा रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे (६३) यांचे हृदयविकाराने सोमवारी रात्री परभणीमध्ये निधन झाले. आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख नेतृत्व हरवल्याची भावना सामान्यांतून व्यक्त होत आहे.
विजय वाकोडे यांचे महाविद्यालयीन जीवनापासून आंबेडकरी चळवळीशी अतूट नाते होते. विविध प्रकारच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. दलित पँथरच्या माध्यमातून त्यांनी संघटनेत कामाला सुरूवात केली. लाँग मार्चपासून ते सध्या सुरू असलेल्या संविधान प्रतिकृतीच्या अवमान घटनेनंतर झालेल्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. विविध प्रकारच्या आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी शहरासह मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे काम केले आहे. विजय वाकोडे सध्या रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांची वक्तृत्व शैली, संघटन यामुळे ते लढवय्ये नेते म्हणून सर्वत्र परिचित होते.
दरम्यान, परभणीतील संविधान अवमान प्रकरणानंतर सुरू असलेले आंदोलनसुद्धा त्यांनी संयमाने हाताळले. सोमवारी पुकारलेल्या धरणे आंदोलनात ते सक्रिय होते. त्यांनी याप्रसंगी भाषण करताना सर्व घटनेचा निषेध करून शांततेचे आवाहन केले. सायंकाळी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कारावेळी ते हजर होते. यानंतर त्यांना अस्वस्थता जाणवल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. विजय वाकोडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, नातवंडे, जावई, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. आंबेडकरी अनुयायांचा मोठा आधारवड हरपल्याची भावना जनसामान्यांनी व्यक्त केली.