मानवत शहरातील अवैध धंद्याविरोधात सर्वपक्षीय मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:06 IST2018-04-28T15:06:39+5:302018-04-28T15:06:39+5:30
शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत, या धंद्याशी संबंधित लोकांची शहरात गुंडगिरी वाढत आहे यामुळे पोलीस प्रशासनाने याविरोधात कडक पावले उचलावीत या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

मानवत शहरातील अवैध धंद्याविरोधात सर्वपक्षीय मोर्चा
मानवत (परभणी ) : शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत, या धंद्याशी संबंधित लोकांची शहरात गुंडगिरी वाढत आहे यामुळे पोलीस प्रशासनाने याविरोधात कडक पावले उचलावीत या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.
मागील काही दिवसांपासून शहरातील व्यापारी, उद्योजक, सामन्य नागरिकांवर गुंडाकडून होणारी दमदाटी थांबवावी, हद्दपारीचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढावीत, वाढलेली अवैध धंदे बंद करावेत तसेच नागरी सुरक्षा दलाची स्थापना करावी या मागण्यांसाठी सर्व पक्षीय कृती समितीच्या आज दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात आला. नगरपालिका पासुन निघालेला हा मोर्चा मुख्य रस्त्याने जात पोलीस ठाण्यावर धडकला. येथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी बोलताना आमदार बाबाजानी दुरार्णी यांनी, बालकिशन चांडक या जेष्ठ नेत्याला घरात घुसुन शिवीगाळ केल्याचा घटनेचा निषेध केला. तर अशा घटना पुन्हा घडल्या तर पोलीस ठाण्याला घेराओ घालुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी दिला. यासोबतच शहरातील गुंडागर्दीला अवैध धंदेच जबाबदार असल्याने हे धंदे बंद करा अशी मागणी माकपचे लिंबाजी कचरे पाटील यांनी केली. पोलीस निरीक्षक प्रदिप पालिवाल यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले व त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
मोर्चात जेष्ठ नेते बालकिशन चांडक, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष पंडितराव चोखट, माजी सभापती मदनराव लाडाणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष परमेश्वर शिंदे कॉंग्रेस चे शहराध्यक्ष शामभाऊ चव्हाण, राष्ट्रवादीचे मोइन अन्सारी, अनंत भदर्गे, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश कच्छवे, भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष शैलेश वडमारे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गजानन बारहाते यांच्यासह सर्व आजीमाजी नगरसेवक आदींचा सहभाग होता.