लॉकडाऊननंतर शिवशाही फक्त दीड महिना धावली रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST2021-04-01T04:18:35+5:302021-04-01T04:18:35+5:30
परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी व परभणी या चार आगारांचा समावेश आहे. या ...

लॉकडाऊननंतर शिवशाही फक्त दीड महिना धावली रस्त्यावर
परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी व परभणी या चार आगारांचा समावेश आहे. या चार आगारांपैकी केवळ परभणी आगाराकडे १० व पाथरी आगाराकडे ५ अशा एकूण १५ शिवशाही बस आहेत. २२ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२१ या वर्षभराच्या कालावधीत सातत्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने या शिवशाही बस आगारामध्ये थांबल्या. केवळ दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दीड महिना या शिवशाही बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने परभणी व पाथरी आगारातील शिवशाही बसची चाके दहा महिन्यांपासून आगारातच थांबलेली आहेत.
दिवाळी सणाच्या काळात प्रतिसाद
मार्च २०२० मध्ये जाहीर झालेला लॉकडाऊन जून महिन्याच्या सुरुवातीपासून शिथिल झाला. त्यानंतर परभणी व पाथरी आगाराकडून शिवशाही बस रस्त्यावर धावू लागली. मात्र, या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या बस काही काळ बंद होत्या. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची मोठी गर्दी झाली. त्यानंतर एसटी महामंडळाने शिवशाही बस सुरू केल्यानंतर प्रवाशांना प्रतिसाद मिळाला. मात्र, याही काळात अपेक्षित उत्पन्न शिवशाही बसकडून एसटी महामंडळाला मिळालेले नाही.
पुणे, मुंबई मार्गावरील गाड्या रिकाम्या
कोरेाना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर परभणी व पाथरी आगाराकडून पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये शिवशाही बस पाठविण्यात आल्या. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने मुंबई, पुणे मार्गावरील गाड्या रिकाम्याच धावू लागल्या.
वर्षभरात शिवशाहीचे उत्पन्न घटले
एसटी महामंडळाच्या परभणी व पाथरी आगारात एकूण १५ शिवशाही बस आहेत. मात्र, सातत्याने जाहीर होणाऱ्या लॉकडाऊनमुळे बस बंद होत्या. त्यानंतर सुरू झालेल्या शिवशाही बसला जिल्ह्यासह परजिल्ह्यात प्रवाशांना प्रतिसाद मिळत नसल्याने वर्षभरात शिवशाहीचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासन अडचणीत सापडले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे एसटीची सेवा वारंवार बंद ठेवण्यात येत आहे. पाथरी व परभणी या दोन आगारात १५ शिवशाही बस उपलब्ध आहेत. दीपावलीच्या काळात या शिवशाही बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतर या बससेवेकडे प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
- मुक्तेश्वर जोशी, विभागीय नियंत्रक, परभणी