अतिवृष्टीनंतर आता चोरट्यांचा डल्ला; शेतातून काढणीला आलेला कापूस वेचून नेला; शेतकरी त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:30 IST2025-10-20T14:26:48+5:302025-10-20T14:30:54+5:30
या चोरीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अतिवृष्टीनंतर आता चोरट्यांचा डल्ला; शेतातून काढणीला आलेला कापूस वेचून नेला; शेतकरी त्रस्त
पाथरी : अगोदरच दुष्काळ, अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटांनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या माथी आता चोरट्यांचे संकट ओढावले आहे. तालुक्यातील वडी शिवारात घडलेल्या घटनेत चोरट्यांनी रात्रीच्या वेळी शेतातील काढणीला आलेला पिकलेला कापूस वेचून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चोरीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खेडूळ येथील शेतकरी धोंडिबा ज्ञानोबा डुकरे यांनी वडी येथील शेतकरी मुरलीधर काबरा यांच्या शेतजमिनीवर ठोक्याने शेती घेतली होती. या शेतात त्यांनी सुमारे तीन एकरांवर कापसाची लागवड केली होती. गेल्या काही दिवसांपासून शेतातील कापूस वेचण्यायोग्य स्थितीत आला होता. मात्र, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शेतात प्रवेश करून तीन एकरांतील संपूर्ण कापूस वेचून गायब केल्याचे उघड झाले.
शनिवारी सकाळी शेतकरी डुकरे शेतात गेले असता संपूर्ण शेत ओसाड दिसले. झाडांवरचा कापूस चोरट्यांनी वेचून नेल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ गावकऱ्यांना माहिती दिली. परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शोध घेतला, परंतु चोरट्यांचा काहीही मागमूस लागला नाही. या घटनेमुळे शेतकरी डुकरे यांना जवळपास 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. आधीच दुष्काळ, अतिवृष्टी आणि कापसाच्या भावातील चढउतारामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता या चोरीने आणखी फटका बसला आहे.
गावकऱ्यांनी सांगितले की, परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तींच्या हालचाली दिसून येत होत्या. मात्र त्याकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही. आता या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या शेतकऱ्याने दुसऱ्या दिवशी रात्री गावातील आठ दहा शेतकऱ्यांना एकत्र घेत शेतातील बांधावर रात्रभर जागरण काढली. मात्र, चोरट्यांनी पहिल्या दिवशी हात मारल्याने दुसऱ्या दिवशी चोरट्याने आले नाही.