प्राणवायूच्या प्रकल्पासाठी प्रशासनाची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:17 IST2021-05-09T04:17:50+5:302021-05-09T04:17:50+5:30

परभणी: कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्राणवायू मिळविताना होत असलेली हेळसांड लक्षात घेऊन मंजूर झालेल्या चार ऑक्सिजन प्रकल्पांपैकी एकही प्रकल्प अद्याप ...

The administration's frustration for the oxygen project | प्राणवायूच्या प्रकल्पासाठी प्रशासनाची दमछाक

प्राणवायूच्या प्रकल्पासाठी प्रशासनाची दमछाक

परभणी: कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्राणवायू मिळविताना होत असलेली हेळसांड लक्षात घेऊन मंजूर झालेल्या चार ऑक्सिजन प्रकल्पांपैकी एकही प्रकल्प अद्याप पूर्णत्वाला गेला नाही. त्यामुळे प्राणवायू प्रकल्पांसाठी प्रशासनाची दमछाक होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, अनेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाल्याने एप्रिल महिन्यात मोठा गदारोळ उडाला होता. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाठपुरावा करून परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील ऑक्सिजन प्रकल्प परभणीसाठी मंजूर करून घेतला. १८ एप्रिल रोजी हा प्रकल्प मंजूर होऊन दुसऱ्याच दिवशी यंत्रणा जिल्ह्यात दाखल झाली. त्यापाठोपाठ जिल्हा रुग्णालयात दुसरा प्रकल्प मंजूर झाला. जिल्हा परिषदेतील प्रकल्प आठवडाभरात उभारून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होईल, असे सांगण्यात आले; मात्र आज २० दिवसांचा कालावधी उलटला तरीही हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला नाही. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प आणि बजाज कंपनीने सेलू येथे मंजूर केलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे काम प्राथमिक अवस्थेत आहे.

एकंदरीत जिल्ह्यात ४ ऑक्सिजन प्रकल्प मंजूर झाले असले तरी प्रत्यक्षात एकाही प्रकल्पातून रुग्णांना ऑक्सिजन पुरविले जात नाही. जिल्हा परिषदेच्या रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे; परंतु हा प्रकल्पही पूर्ण होऊन ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी किमान ५ ते ६ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या काही भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या संकट काळात प्रशासनाने अंग झटकून प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वीजपुरवठा, कॉम्प्रेसरच्या अडचणी दूर

येथील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पासाठी वीजपुरवठ्याची मोठी अडचण होती. तसेच कॉम्प्रेसर उपलब्ध नव्हता. या रुग्णालयात अनेक रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर उपचार घेत असल्याने या रुग्णांना पर्यायी व्यवस्था करण्याचे काम जिकिरीचे होते. दोन दिवसांपूर्वी पर्यायी जनरेटरची सुविधा करून प्रकल्पासाठी वीज पुरवठ्याची यंत्रणा उभारण्यात आली. तसेच कॉम्प्रेसरही उपलब्ध झाला आहे. प्रकल्प उभारणारा अभियंता आजारी असल्याने कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता; परंतु आता ही कामे पूर्ण झाली असून, येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये प्रकल्प पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दोन प्रकल्पांची कामे प्राथमिक अवस्थेत

जिल्हा सामान्य रुग्णालयातही ऑक्सिजन प्रकल्प मंजूर असून हे उभारणीचे काम प्राथमिक अवस्थेत आहे. सध्या प्रकल्पासाठी लागणारे बांधकाम पूर्ण झाले आहे. जि. प. इमारतीत प्रकल्प उभारणी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे.

सेलू येथे बजाज कंपनीने मंजूर केलेल्या ऑक्सिजन प्रकल्पासाठी साहित्य उपलब्ध झाले आहे. उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पाईपलाईन पूर्ण करण्यात आली आहे. आणखी उर्वरित कामे मात्र रखडलेली आहे.

२८० जंबो सिलिंडरला मिळणार ऑक्सिजन

जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात उभारल्या जाणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज २८० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्माण होणार आहे. सध्या पर्यायी स्वरूपात सिलिंडर वापरले जात आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर रुग्णांची ऑक्सिजनसाठी होणारी धावपळ थांबणार आहे.

Web Title: The administration's frustration for the oxygen project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.