कापसावर फवारणी करताना किटकनाशक तोंडात गेल्याने तरुण शेतकऱ्याने जीव गमावला
By मारोती जुंबडे | Updated: August 8, 2022 18:32 IST2022-08-08T18:31:40+5:302022-08-08T18:32:07+5:30
डब्याचे झाकण उघडताना किटकनाशक शेतकऱ्याच्या तोंडात गेले

कापसावर फवारणी करताना किटकनाशक तोंडात गेल्याने तरुण शेतकऱ्याने जीव गमावला
सेलू (जि.परभणी) : शेतामध्ये कापसाच्या पिकावर औषधाची फवारणी करताना किटकनाशकाच्या डब्याचे झाकण उघडताना किटकनाशक तोंडात गेल्याने एका १९ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सेलू तालुक्यातील सोन्ना शिवारात रविवारी घडली आहे. योगेश गणेश मगर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
योगेश मगर हे रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सोन्ना शिवारात कापसाच्या पिकावर औषधाची फवारणी करण्यासाठी गेला होता. डब्याचे झाकण उघडताना किटकनाशक योगेशच्या तोंडात गेले. त्यानंतर योगेशला मळमळ, उलटी आणि चक्कर आली. त्रास वाढत गेल्याने योगेशला उपचारासाठी सेलू येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान रविवारी दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सेलू ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, कर्मचारी गौस यांनी भेट दिली. पोलीस कर्मचारी गौस तपास करीत आहेत. मृताच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.