भररस्त्यात उभी केली ट्रक; पाठीमागून दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू, मजूर कुटुंबाचा आधार गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 19:30 IST2024-06-17T19:07:10+5:302024-06-17T19:30:59+5:30
एकमेव आधार हिरवला गेल्याने मजूर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे

भररस्त्यात उभी केली ट्रक; पाठीमागून दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू, मजूर कुटुंबाचा आधार गेला
मानवत (परभणी) : मानवत ते परभणी रस्त्यावर रूढी शिवारात आज सकाळी ६ वाजता भर रस्त्यात उभ्या ट्रकवर पाठीमागून दुचाकी धडकून अपघातात ३१ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सुरेश आसाराम हरकळ असे मृताचे नाव आहे.
तालुक्यातील कोल्हा येथील सुरेश आसाराम हरकळ आज सकाळी आपल्या दुचाकीवरून मानवतकडे प्रवास करत होता. परभणी रस्त्यावर रूढी शिवारात भररस्त्यात एक ट्रक ( क्र. एमएच १४ बीजे २५०६ ) उभा होता. त्या ट्रकवर पाठीमागून दुचाकी धडकल्याने सुरेश हरकळ गंभीर जखमी झाला. परभणी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि सहा महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
रस्त्यावर धोकादायक पद्धतीने ट्रक उभा केल्याने हा अपघात झाला. यात मजूर कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला. या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुंजाभाऊ दत्तराव हरकळ यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.