अनियंत्रित भरधाव टेम्पो बसला घासत गेला; १४ वर्षीय प्रवासी मुलीच्या हाताची बोटे तुटली
By मारोती जुंबडे | Updated: May 26, 2023 15:34 IST2023-05-26T15:32:11+5:302023-05-26T15:34:01+5:30
चालक पिकअप टेम्पो भरधाव वेगाने चालवत असल्याने दोन वाहने एकमेकांना घासली

अनियंत्रित भरधाव टेम्पो बसला घासत गेला; १४ वर्षीय प्रवासी मुलीच्या हाताची बोटे तुटली
चारठाणा: भरधाव वेगाने येणारे वाहन बसला घासल्याने एका १४ वर्षीय मुलीचे दोन बोटे तुटल्याचा प्रकार देवगाव फाटा- जिंतूर रस्त्यावरील बोरकिनी पाटील जवळ गुरुवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी बसचालक राजेभाऊ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात रात्री उशिराने पिकअप वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतुर आगाराची एमएच २० बीएल ३६०४ ही बस छत्रपती संभाजीनगर येथून परभणीकडे प्रवासी घेऊन जात होती. तेवढ्यात देवगाव फाटा- जिंतूर रस्त्यावरील बोरकिनी पाठीजवळ एमएच २६ बीडी ३११९ क्रमांकाचे पिकअप वाहन भरधाव वेगाने व हलगर्जीपणाने चालून एसटी बसला घासले. या घटनेत बसमधील श्रुती प्रकाश शेळके १४ (रा. वलंगवाडी ता. सेलू) हिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या दुखापती मध्ये हातची दोन बोटे तुटली. या घटनेनंतर बसच्या चालकासह प्रवाशांनी चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. डाॅ.माजेद शेख व औषध निर्माण अधिकारी विजय ढाकणे, दीपमाला पाटेकर यांनी श्रुतीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलवले. या घटनेने वाहन चालकाविरुद्ध प्रवाशांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. दरम्यान याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिराने चारठाणा पोलीस ठाण्यात पिकअप वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकिशन कोंढरे हे करीत आहेत.