रागात आक्रित घडलं; नात्यातील अल्पवयीन मुलाने कुऱ्हाडीने घाव घालून एकास झोपेतच संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 15:11 IST2023-02-28T15:11:05+5:302023-02-28T15:11:34+5:30
वसमत तालुक्यातील सेलू येथील घटना

रागात आक्रित घडलं; नात्यातील अल्पवयीन मुलाने कुऱ्हाडीने घाव घालून एकास झोपेतच संपवलं
- इस्माईल जहागिरदार
वसमत (हिंगोली): तालुक्यातील सेलू येथे नात्यातील अल्पवयीन मुलानेच एकाचा झोपेत असताना कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ कारवाई करत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना अल्पवयीन मुलास कुरुंदा पोलीसांनी ताब्यात घेतले.
भाऊराव पांडुरंग कबले ( ४२) असे मृताचे नाव आहे. वसमत तालुक्यातील सेलू येथे कबले यांचे वास्तव्य आहे. सोमवारी ( दि. २७ ) रात्री ते घरात झोपले होते. मध्यरात्री नात्यातील एका अल्पवयीन मुलाने झोपेत असलेल्या कबले यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. मानेवर व तोंडावर कुऱ्हाडीचे वार झाल्याने कबले यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अल्पवयीन मुलगा आणि इतर काही नातेवाईक आज पहाटे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची तयारी करत होते. याची गुप्त माहिती कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन मोरे यांना समजली. यावरून मोरे यांच्यासह जमादार बालाजी जोगदंड, संतोष पटवे, तुकाराम आम्ले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी १७ वर्षीय मुलास ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केला आहे.