गतीमंद मुलीस अत्याचारातून गर्भधारणा; डीएनए टेस्टने गुन्हा सिद्ध, आरोपीस १४ वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:08 IST2025-02-13T13:04:55+5:302025-02-13T13:08:29+5:30
गतीमंद अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार करणाऱ्यास १४ वर्ष सश्रम कारावास; परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला निकाल

गतीमंद मुलीस अत्याचारातून गर्भधारणा; डीएनए टेस्टने गुन्हा सिद्ध, आरोपीस १४ वर्षांची शिक्षा
परभणी : अल्पवयीन पीडितेवर बळजबरीने अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपीविरुद्ध दाखल गुन्ह्यात परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश- १ एस.एस.नायर यांनी बुधवारी निकाल दिला आहे. या आरोपीला दोषी ठरवून १४ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत पूर्णा पोलीस ठाण्यात ५ ऑगस्ट २०१९ मध्ये जवाब दिला होता. अल्पवयीन मनोरुग्ण असलेल्या पिडीतेवर आरोपी मनोज रौत्रे याने बळजबरीने अत्याचार केला होता. पूर्णा पोलीस ठाण्यात याबाबत मनोज लक्ष्मण रौत्रे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी केला होता. सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेस जे बाळ जन्माला आले, त्या बाळाचा पिडीतेचा व आरोपी मनोजचा डीएनए एकच असल्याबाबत वैद्यकीय अहवाल तसेच पीडिता मनोरुग्ण असल्याबद्दल लेखी अहवाल सिद्ध करण्यात आला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ एस. एस.नायर यांनी सर्व साक्षपुराव्याचे अवलोकन करून बुधवारी आरोपी मनोज लक्ष्मण रौत्रे यास कलम ३७६ (२) (एल) भादवी अन्वये दोषी ठरवून १४ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष साधा करावा अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद गिराम यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सुरेश चव्हाण, अंमलदार प्रमोद सूर्यवंशी, राजीव दहिफळे, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.