'पूल नाही म्हणून जीव गेला!' संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आणला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:59 IST2025-09-08T11:58:45+5:302025-09-08T11:59:07+5:30
ई-पिक पाहणीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू. ग्रामस्थांचा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप.

'पूल नाही म्हणून जीव गेला!' संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आणला
- मारोती जुंबडे
परभणी : शेतातील पिकांची ई-पिक पाहणी करण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना परभणी तालुक्यातील धारणगाव येथे घडली. ही घटना रविवारी घडली असून सोमवारी सकाळी आठ वाजता समसापूर बंधाऱ्याजवळ मृतदेह सापडला. या घटनेमुळे डुकरे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मृत तरुणाचे नाव गजानन आश्रोबा डुकरे (वय २२, रा. धारणगाव) असे आहे. रविवारी तो आपल्या शेतातील कापूस व सोयाबीन पिकांची ई पिक पाहणी करण्यासाठी निघाला होता. शेतात जाण्यासाठी दुधना नदी पार करावी लागत असल्याने तो पाण्यात उतरला. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली, परंतु गजानन सापडला नाही. सोमवारी पहाटे पुन्हा सुरू केलेल्या शोधमोहीमेत सकाळी ८ वाजता समसापूर बंधाऱ्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.या घटनेमुळे प्रशासनावर ग्रामस्थांचा रोष प्रचंड वाढला आहे. आता प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मृतदेहासह जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांची धडक
या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या धारणगाव ग्रामस्थांनी गजाननचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. "धारणगावातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी असूनही दुधना नदीवर पूल उभारण्यात प्रशासन अपयशी ठरले. जर पूल झाला असता तर आज गजाननचा जीव वाचला असता," असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की, जोपर्यंत पुलाचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह हलविला जाणार नाही.
बंधाऱ्यामुळे पाणी साचून जीव धोक्यात
धारणगावच्या समोर समसापूर गाव आहे. सिंचनासाठी येथे बंधारा बांधण्यात आला असला तरी तो चुकीच्या पद्धतीने उभारल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर साचते, त्यामुळे नदी ओलांडताना नागरिकांचा जीव धोक्यात येतो. शेतकऱ्यांना पलीकडील शेती करणे कठीण बनले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ठाम मागणी केली आहे की, "हा बंधारा फोडा, अन्यथा दुधना नदीवर पूल उभारा."