परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा; कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 19:34 IST2026-01-25T19:33:35+5:302026-01-25T19:34:19+5:30

परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना या गावात जन्मलेले श्रीरंग उर्फ दादा लाड यांनी आपले संपूर्ण आयुष्य ग्रामीण भारत, शेतकरी, समाज आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी समर्पित केले.

A crown of honor on Parbhani's; Padma Shri Award announced for Shrirang Lad for his significant contribution in the field of agriculture | परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा; कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा; कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

राजन मंगरुळकर

परभणी : जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीरंग उर्फ दादा लाड यांना कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराने परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना या गावात जन्मलेले श्रीरंग उर्फ दादा लाड यांनी आपले संपूर्ण आयुष्य ग्रामीण भारत, शेतकरी, समाज आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी समर्पित केले. विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते निगडित कार्य करीत आहेत. सन १९६८ पासून त्यांनी पूर्णवेळ स्वयंसेवक, प्रचारक म्हणून संघटनात्मक व सामाजिक कार्यास प्रारंभ केला.

भारतीय किसान संघामध्ये सन १९८३ पासून सक्रिय असलेल्या दादा लाड यांनी महाराष्ट्र, गोवा व गुजरात या राज्यांसाठी प्रादेशिक महामंत्री म्हणून कार्य केले. सध्या ते भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. देशभरातील शेतकरी प्रश्न, कृषी धोरणे, स्वदेशी व शाश्वत शेती पद्धतीबाबत त्यांनी ठोस व अभ्यासपूर्ण भूमिका मांडली. शेतकऱ्यांशी थेट संवाद, शेतात जाऊन मार्गदर्शन, तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यांनी केली.

दादा लाड कापूस तंत्रज्ञान ठरले यशस्वी

कृषी संशोधन क्षेत्रातील त्यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे दादा लाड कापूस तंत्रज्ञान. उच्च घनता लागवड पद्धतीत कापूस पिकातील निष्फळ फांद्यांचे शास्त्रीय व्यवस्थापन, योग्य वेळी टॉपिंग, ठिबक सिंचन व पॉलीमल्चिंग यांचा समन्वय साधून विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामुळे कापूस उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. भारतीय कृषी संशोधन परिषद तसेच महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी या तंत्रज्ञानाची शास्त्रीय पडताळणी करून राज्यभर शिफारस केली. आज हे तंत्रज्ञान हजारो शेतकऱ्यांनी यशस्वीपणे स्वीकारले आहे. याच त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने डिसेंबर २०२५ मध्ये कृषी संशोधन व शेतकरी हितासाठीच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान केली.

शेती क्षेत्रात दादा लाड यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे व दिशादर्शक आहे. त्यांच्या प्रयोगशीलतेमुळे राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करून अशा शेतकऱ्यांच्या कार्याला बळ दिले आहे. यापूर्वी वनामकृवि विद्यापीठाने त्यांना मानद पीएचडी पदवी प्रदान केली होती. आता केंद्र शासनाकडून मिळालेला पद्मश्री सन्मान आमच्या विश्वासाला अधिक बळ देणारा आहे. - डॉ. इंद्र मणी कुलगुरू, वनामकृवि.

कृषी संशोधन, शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास आणि देशी गोवंश संवर्धन या क्षेत्रातील त्यांच्या अनेक दशकांच्या सातत्यपूर्ण व परिणामकारक योगदानाची ही सर्वोच्च राष्ट्रीय पातळीवरील दखल आहे. याचा जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्यातील शेतकऱ्यांना अभिमान आहे. हा सन्मान शेतकरी केंद्रित संशोधन आणि स्वदेशी कृषी तंत्रज्ञानाच्या विचाराला राष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारा ठरला आहे.- डॉ. रामेश्वर नाईक, परभणी विभाग संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

कित्येक वर्षांपासून शेताच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन शेतकरी सोबतच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविताना त्यांनी प्रयत्न केले. देशासाठी जगायचं म्हणून शेतामध्ये राबायचं असा जीवन संदेश शेतकऱ्यांना श्रीरंग उर्फ दादा लाड यांनी आजपर्यंत दिला आहे. त्यांना घोषित झालेला पुरस्कार अभिमानाची बाब आहे. - अविनाश गोहाड, प्रांत मंत्री, संस्कृत भारती.

देशातील शेतकरी वर्ग कसा भरभराटीला येईल व ते करण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो, याची तळमळ त्यांच्या कामातून दिसून येते. श्रीरंग उर्फ दादा लाड यांच्या कृषी क्षेत्रात योगदानामुळे योग्य व्यक्तीला हा मान मिळाल्याने परभणीकरांना अभिमान आहे. - राजेंद्र सोनी, परभणी.

Web Title : कृषि योगदान के लिए श्रीरंग लाड पद्म श्री से सम्मानित

Web Summary : ग्रामीण भारत और किसानों के लिए समर्पित श्रीरंग लाड को कृषि में महत्वपूर्ण योगदान, विशेष रूप से दादा लाड कपास प्रौद्योगिकी के लिए पद्म श्री मिला। यह मान्यता टिकाऊ खेती और किसान कल्याण में उनके काम को उजागर करती है, जिससे परभणी और मराठवाड़ा को गर्व है।

Web Title : Srirang Lad Honored with Padma Shri for Agriculture Contribution

Web Summary : Srirang Lad, dedicated to rural India and farmers, receives Padma Shri for his significant contribution to agriculture, notably the Dada Lad cotton technology. This recognition highlights his work in sustainable farming and farmer welfare, bringing pride to Parbhani and Marathwada.