मालमत्ता कराला ९०, पाणीपट्टी शास्तीला १०० टक्के सूट; परभणीकरांसाठी अभय योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:24 IST2025-02-01T16:23:13+5:302025-02-01T16:24:32+5:30
महापालिका आयुक्तांनी घेतला निर्णय; १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मालमत्ता कराला ९०, पाणीपट्टी शास्तीला १०० टक्के सूट; परभणीकरांसाठी अभय योजना
परभणी : महापालिका क्षेत्रात मालमत्ताधारकांकडे असलेल्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कराचा भरणा करून घेण्यासाठी मनपाने विलंब शास्ती सूट अभय योजना लागू केली. यामध्ये मालमत्ता कर विलंब शास्तीमध्ये ९० टक्के तर पाणीपट्टी विलंब शास्तीमध्ये शंभर टक्के सूट असलेली अभय योजना राबविण्यास १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी घेतला आहे.
महापालिका हद्दीत मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर थकीत आहे. याची वसुली अधिक प्रमाणात व्हावी, याकरिता विलंब शास्ती योजना जाहीर करण्यात आली. यात १६ ते ३१ जानेवारीपर्यंत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ता कर व पाणीपट्टी एकरकमी भरल्यास मालमत्ता कर विलंब शास्तीमध्ये ९० टक्के तर पाणीपट्टी विलंब शास्तीमध्ये १०० टक्के सूट असलेली अभय योजना जाहीर केली होती. या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा १५ फेब्रुवारीपर्यंत विशेष बाब म्हणून ही सूट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी विहित मुदतीत चालू वर्षापर्यंत त्यांचा मालमत्ता कर व पाणीपट्टी रक्कम भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.