संचारबंदी काळात ७१ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:14 IST2021-04-03T04:14:32+5:302021-04-03T04:14:32+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदीचा उपाय लागू केला. २४ मार्चपासून जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. या ...

संचारबंदी काळात ७१ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदीचा उपाय लागू केला. २४ मार्चपासून जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीत आता ५ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. संचारबंदीच्या आतापर्यंतच्या दहा दिवसांच्या काळामध्ये तब्बल ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंता वाढत आहेत. या काळात १ एप्रिल रोजी सर्वाधिक ११ रुग्ण दगावले, तर २८ मार्च रोजी १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
संचारबंदीच्या १० दिवसांच्या काळात ३ हजार ९४३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. रुग्णांची संख्या एवढ्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग चिंताजनक वळणावर पोहोचलो आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या आणि मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी स्वतःहून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
१९४२ रुग्णांची कोरोनावर मात
संचारबंदी काळात १ हजार ९४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण नोंद होण्याच्या संख्येपेक्षाही कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. ३१ मार्च रोजी सर्वाधिक ३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर २ एप्रिल रोजी ३१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.