संचारबंदीत ७ तासांची सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST2021-04-02T04:17:28+5:302021-04-02T04:17:28+5:30
परभणी : व्यापारी आणि पक्ष, संघटनांच्या वाढत्या दबावामुळे अखेर संचारबंदी काळात ७ तासांची सूट देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर ...

संचारबंदीत ७ तासांची सूट
परभणी : व्यापारी आणि पक्ष, संघटनांच्या वाढत्या दबावामुळे अखेर संचारबंदी काळात ७ तासांची सूट देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी घेतला आहे.
कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी मागील सात दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली असून, नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठीही मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. प्रशासनाच्या संसारबंदीला विविध पक्ष, संघटना आणि व्यापाऱ्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. बाजारपेठ सुरू ठेवण्यासाठी काही काळ संचारबंदीत शिथिलता द्यावी, अशीही मागणी होत होती. यासाठी व्यापाऱ्यांची शिष्टमंडळे तसेच अनेक पक्ष, संघटनांनी प्रशासनाला निवेदन देऊन संचारबंदी मागे घेण्याची मागणी केली आहे.
वाढत असलेला विरोध लक्षात घेऊन संचारबंदीत काही काळाची सूट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १ एप्रिल रोजी आदेश काढून ही सूट जाहीर केली.
या काळात बाजारपेठ सुरू राहणार
जिल्ह्यात सध्या ५ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू आहे. नागरिकांना गरजेच्या वस्तूंचा पुरवठा व्हावा, यासाठी संचारबंदी काळामध्ये सूट दिली जात आहे. त्यानुसार २ एप्रिलपासून सर्व आस्थापना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुपारी २ वाजेनंतर मात्र संचारबंदी लागू राहणार आहे.
...तर होणार कारवाई
दुपारी २ वाजेपासून मात्र संचारबंदीचे काटेकोर पालन केले जाणार आहे. या काळात कोणीही रस्त्याने अथवा बाजारात फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे गृहीत धरले जाईल, असा इशाराही या आदेशात दिला आहे.