गुप्तधन देण्याचा बनाव करुन साडेपाच लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:54 IST2019-01-31T16:53:20+5:302019-01-31T16:54:55+5:30
गुप्तधनाची सराफा दुकानात जावून खात्री केली तेव्हा ते सोने नसल्याचे स्पष्ट झाले.

गुप्तधन देण्याचा बनाव करुन साडेपाच लाखांना गंडा
परभणी : गुप्तधनात सापडलेले सोने देण्याचा बनाव करुन परभणीतील एका दुध विक्रेत्याला साडेपाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ३० जानेवारी रोजी घडला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
शहरातील महेंद्र नगर भागातील रहिवासी परमेश्वर गणेशराव पुरणवाड यांचा दुध विक्रीचा व्यवसाय आहे. ३० जानेवारी रोजी उदगीर येथील दोन व्यक्तींसमवेत त्यांची भेट झाली. आम्हाला गुप्तधन सापडले असून त्यातील सोन्याची साखळी एक किलो वजनाची असल्याची सांगत हे सोने देतो, असा बनाव केला. त्यानंतर परमेश्वर पुरणवाड यांच्याकडून नगदी ३ लाख रुपये आणि ८ तोळे सोने घेऊन सोन्याची साखळी म्हणून एक साखळी त्यांना दिली.
त्यानंतर पुरणवाड यांनी सराफा दुकानात जावून खात्री केली तेव्हा ही साखळी सोन्याची नसल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर परमेश्वर पुरणवाड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून त्यावरुन मुसा महेबुब लदाफ (रा.कलामंदिर जवळ, उमा चौक, उदगीर ) आणि अन्य एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक बाबु गिते तपास करीत आहेत.