विहिरींच्या वर्क ऑर्डरसाठी ३५ हजारांची लाच; बिडीओसह कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
By राजन मगरुळकर | Updated: February 28, 2025 13:24 IST2025-02-28T13:24:34+5:302025-02-28T13:24:55+5:30
पाथरीमध्ये पंचायत समितीच्या आवारामध्येच एसीबीच्या पथकाची कारवाई

विहिरींच्या वर्क ऑर्डरसाठी ३५ हजारांची लाच; बिडीओसह कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
परभणी : तक्रारदार यांच्या ७ विहिरींच्या वर्क ऑर्डर मिळण्यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावाला मंजूर करण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी ३५ हजारांच्या लाचेची मागणी केली. सदरील लाचेची रक्कम गट विकास अधिकारी यांच्या सांगण्यावरून बाह्यस्त्रोत कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याने स्वीकारली. ही सापळा कारवाई पाथरी पंचायत समितीत गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.
ईश्वर बाळू पवार, गट विकास अधिकारी पं.स. आणि गोवर्धन मधुकर बडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पं.स.पाथरी अशी आरोपी लोकसेवकांची नावे आहेत. तक्रारदार यांनी पंचायत समिती पाथरीमध्ये झरी ग्रामपंचायत अंतर्गतच्या ७ विहिरींचे वर्क ऑर्डर मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. ते वर्क ऑर्डर मंजूर करण्यासाठी एका विहिरीचे पाच हजार याप्रमाणे ३५ हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून लोकसेवक ईश्वर पवार यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार गुरुवारी तक्रारदाराने दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यानुसार पडताळणीत लाच रक्कम स्वीकारण्यास संबंधिताने सहमती दर्शविली. सायंकाळी पं. स. आवारात सापळा कारवाईत आरोपी लोकसेवक गोवर्धन बडे याने पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून ३५ हजार लाचेची रक्कम लोकसेवक ईश्वर पवार यांच्या सांगण्यावरून स्वीकारली.
घर झडतीत मिळाले ६३ हजार
लोकसेवक गोवर्धन बडे यांच्याकडे अंगझडतीत ३५ हजार लाचेची रक्कम व त्या व्यतिरिक्त रोख ८ हजार व लोकसेवक ईश्वर पवार यांच्याकडे रोख सहा हजार मिळाले. लोकसेवक ईश्वर पवार व बडे यांचे पंचायत समिती पाथरी शासकीय वसाहतीत निवासस्थानाची घर झडती घेतली असता ईश्वर पवार यांच्या घरझडतीत ६३ हजार रोख मिळाले. संबंधित दोघांविरुद्ध पाथरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी, पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे, निलपत्रेवार, रवींद्र भूमकर, सीमा चाटे, नामदेव आदमे, अतुल कदम, कल्याण नागरगोजे, श्याम बोधनकर, जे.जे.कदम, नरवाडे यांच्या पथकाने केली.