३१ टक्केच माती नमुने केले परभणी जिल्हा सर्वेक्षणकडून जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:27 AM2018-07-14T00:27:59+5:302018-07-14T00:28:29+5:30

येथील जिल्हा मृद सर्व्हेक्षण कार्यालयाकडे राष्ट्रीय शाश्वत अभियानांतर्गत ३६ हजार ४८१ माती नमुने परिक्षणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी जून महिना अखेर हे उद्दिष्ट ६० टक्के पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र १० जुलैपर्यंत केवळ ११ हजार ४५० माती नमुने परिक्षणासाठी गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात केवळ ३१ टक्केच माती नमुने गोळा झाले आहेत.

31% of the soil samples done by Parbhani district survey | ३१ टक्केच माती नमुने केले परभणी जिल्हा सर्वेक्षणकडून जमा

३१ टक्केच माती नमुने केले परभणी जिल्हा सर्वेक्षणकडून जमा

googlenewsNext
ठळक मुद्दे३६ हजार नमुन्यांचे उद्दिष्ट: परभणी तालुका आघाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: येथील जिल्हा मृद सर्व्हेक्षण कार्यालयाकडे राष्ट्रीय शाश्वत अभियानांतर्गत ३६ हजार ४८१ माती नमुने परिक्षणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी जून महिना अखेर हे उद्दिष्ट ६० टक्के पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र १० जुलैपर्यंत केवळ ११ हजार ४५० माती नमुने परिक्षणासाठी गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात केवळ ३१ टक्केच माती नमुने गोळा झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनामध्ये जमीन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेतीचा होणारा असंतुलीत वापर, प्रमाणाच्या अधिक रासायनिक खतांचा वापर, समस्याग्रस्त क्षेत्रामध्ये वाढ, जमीन सतत पिकाखाली राहणे व नैसर्गिक संकटामुळे शेतक-यांच्या उत्पादनामध्ये मोठी घट होत आहे. त्यामुळे जिल्ह्याची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखल्या जाणा-या खरीप हंगामातील पिकांवर शेतक-यांनी केलेला खर्च उत्पादनातून निघत नाही. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी गेल्या चार ते पाच वर्षापासून मोठ्या आर्थिक अडचणीत सापडत आहेत. या परिस्थितीतून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक शेतक-याला आपल्या जमिनीच्या मातीची तपासणी करुन जमिनीच्या मातीनुसार पिके व रासायनिक, सेंद्रीय खते वापरुन उत्पादकता वाढविण्यासाठी जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आली. या कार्यालयाला २०१८-१९ साठी ३६ हजार ४८१ शेतक-यांचे माती नमुने गोळा करण्याचे उद्दीष्ट होते. जमा केलेले माती नमुने प्रयोगशाळेस पाठवून माती नुसार पिके, खते व औषधी वापरण्यासाठी जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करण्यासाठी शेतक-यांकडून कृषी विभागाचे कृषी सहाय्यक माती नमुने गोळा करणे व जिल्हा मृद सर्व्हेक्षण कार्यालयाच्या लॅबकडे सुपूर्द करणे तसेच लॅबने प्राप्त झालेले माती नमुने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील प्रयोगशाळेकडे पाठविणे गरजेचे आहे.
जिल्ह्याची अर्थ व्यवस्था खरी तर खरीप हंगामावरच अवलंबून आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या आधी मातीच्या नमुन्यांची तपासणी करुन संबंधित शेतकºयांना जमिनीच्या नमुन्यावरुन पिके व रासायनिक खताची किती मात्रा द्यायची, या याबाबतच्या ६० टक्के शेतकºयांच्या आरोग्यपत्रिका हातात पडणे अपेक्षित होते.
मात्र कृषी सहाय्यकांकडूनच जून अखेर केवळ ११ हजार ४५० माती नमुने लॅबकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत माती नमुने गोळा करण्याचे काम केवळ ३१.३९ टक्केच १० जुलैपर्यंत पूर्ण झाल्याने शेतकºयांना खरीप हंगामाच्या तोंडावर आरोग्य पत्रिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.
---
असा घ्यावा लागतो नमुना
मातीचा नमुना तपासणीला देण्यासाठी शेतातील पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्व व खते दिल्यानंतर ३ महिन्यांनी तपासणीसाठी घ्यावा लागतो. मातीचा रंग किंवा जमिनीचा खडकाळपणा, उंच, सखलपणा, पिकातील फरक व बागायत, जिरायत स्थिती लक्षात घेऊन त्याच्या प्रमाणे शेतीचे वेगवेगळे भाग पडावेत व त्या प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक देऊन १० हेक्टरसाठी १ मातीचा नमुना गोळा करावा लागतो. त्यानंतर जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालयाकडे पाठवावा लागतो. तपासणीसाठी शेतक-यांकडून ३५ रुपये, विशेष तपासणीसाठी २७५, सुक्ष्म तपासणीसाठी २०० रुपयांची फीस आकारणी केली जाते.
---
परभणी तालुक्यातील ३ हजार २६५ माती नमुने गोळा
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाकडे परभणी तालुक्यातील ३ हजार २६५ शेतक-यांचे मातीचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. ज्याची टक्केवारी ५७.८७ टक्के आहे. पूर्णा तालुक्यातील १३०९ (३०.३७ टक्के), पाथरी ९८७ (४४.७२ टक्के), मानवत ५५७ (२१.२४), सेलू १६२५ (४४.८२), गंगाखेड ६०१ (१२.४५), पालम ७८३ (२०.६९), जिंतूर १३७१ (१८.३७), सोनपेठ ९५२ (४७.५२ टक्के) असे एकूण ११ हजार ४५० माती नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत.
---
गतवर्षी दीड लाख पत्रिकांचे वाटप
जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाकडे २०१७-१८ या वर्षात १ लाख ७३ हजार ९५९ जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ६८ हजार ८९० माती नमुने गोळा करुन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणीनंतर या कार्यालयाकडून १ लाख ६८ हजार ८९० शेतक-यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले होते.
---
८१३ नमुन्यांचीच झाली तपासणी
जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या ११ हजार ४५० माती नमुन्यांपैकी ४ हजार ५८८ माती नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी फक्त ८१३ नमुन्यांचे प्रयोगशाळेकडून परिक्षण करण्यात आले आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील ४१७, पूर्णा २५०, सेलू ६३, जिंतूर ३३ तर सोनपेठ तालुक्यातील ५० नमुन्यांचा समावेश आहे. पाथरी, मानवत, गंगाखेड, पालम या चार तालुक्यातील एकाही माती नमुन्याची प्रयोगशाळेकडून अद्यापपर्यंत तपासणी करण्यात आली नाही.
---
शेतक-यांनी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या मृद आरोग्य पत्रिकानुसारच खरीप हंगामातील पिकांसाठी खते व औषधींचा वापर करुन त्यानुसार पिके घ्यावीत. त्यामुळे वाढीव उत्पन्न मिळण्यास शेतकºयांना मदत होईल.
-सुरेंद्र पवार, जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी

Web Title: 31% of the soil samples done by Parbhani district survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.