जिल्ह्यातील आठवीपर्यंतचे ३ लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST2021-04-05T04:15:32+5:302021-04-05T04:15:32+5:30
परभणी : जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या वर्गातील २ लाख ९३ हजार ५९६ विद्यार्थी यंदा परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार ...

जिल्ह्यातील आठवीपर्यंतचे ३ लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास
परभणी : जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या वर्गातील २ लाख ९३ हजार ५९६ विद्यार्थी यंदा परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयाचा या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
राज्यभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून विविध माध्यमातून खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाचा जिल्ह्यातील २ लाख ९३ हजार ५९६ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यात पहिली ते पाचवीचे १ लाख ८६ हजार १२१ आणि सहावी ते आठवीच्या १ लाख ७ हजार ४७५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षणमंत्र्यांनी याबाबत घोषणा केल्यानंतर आता या संदर्भात प्रत्यक्ष शिक्षण विभागाकडून आदेश कधी काढला जातो, याकडे सर्व विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. या निर्णयाबाबत पालकांमधून मात्र संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी विद्यार्थ्यांची थेट परीक्षाच रद्द करणे योग्य नाही. याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. परीक्षा नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहणार नाही. त्यामुळे शासनाने अन्य मार्गाचा विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांची परीक्षा होणे आवश्यक आहे.
- गणेश काळे, पालक
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. ऑफलाईन परीक्षा घेतल्या तर विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढच्या वर्षी घेतल्या तरी चालतील. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आहे.
- अशोक पाटील, पालक
आजच्या स्पर्धेच्या युगात परीक्षा पद्धत असणे गरजेचे आहे. त्याची सवय शालेय जीवनापासून मुलांना लागली पाहिजे तरंच ते भविष्यात यशस्वी होतील. आता परीक्षाच नाही म्हटल्यावर विद्यार्थी अभ्यास कशाला करतील? त्यांना अभ्यासाविषयी गोडी राहणार नाही. परीक्षा असायलाच हवी.
- एजाज पटेल, पालक
विद्यार्थ्यांची परीक्षा झालीच पाहिजे. सद्यस्थिती अवघड असली तरी यावर उपाय शोधला पाहिजे. यासाठी ऑनलाईन परीक्षा किंवा एखादा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे महत्त्व कळायला हवे.
- प्रवीण सोनोने, शिक्षक