'गोदेतील मगर अन् इंग्रज लेफ्टनंट'; २१७ वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेचा गंगाखेडच्या शिलालेखातून उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 19:00 IST2026-03-17T18:56:14+5:302026-03-17T19:00:04+5:30

गंगाखेडच्या इतिहासात मोठी भर! गोदावरी स्वच्छतादूतांना सापडला दुर्मिळ शिलालेख; निजाम-ब्रिटिश संबंधांवर नवा प्रकाश

217-Year-Old British Inscription Found in Gangakhed's Godawari Basin: Lieutenant H.A. Howell’s Tragic Death Recorded | 'गोदेतील मगर अन् इंग्रज लेफ्टनंट'; २१७ वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेचा गंगाखेडच्या शिलालेखातून उलगडा

'गोदेतील मगर अन् इंग्रज लेफ्टनंट'; २१७ वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेचा गंगाखेडच्या शिलालेखातून उलगडा

सुनिल कोणार्डे
गंगाखेड (जि. परभणी):
गोदावरीच्या काठावर वसलेले गंगाखेड शहर ऐतिहासिक वारशासाठी नेहमीच ओळखले जाते. येथे वेळोवेळी सापडणारे पुरावे इतिहासाच्या नव्या पानांची उकल करत असतात. नुकताच गंगाखेडमध्ये सापडलेला एक ब्रिटिशकालीन शिलालेख संशोधकांसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. हा पुरावा इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा ठरला आहे.

शहरातील संत जनाबाई मंदिराच्या पश्चिमेस सुमारे ३०० मीटर अंतरावर, गोदावरी नदीकाठी एका लहानशा ब्रिटिश कब्रस्थानाचे अवशेष आढळून आले. याच ठिकाणी काळ्या बेसाल्ट दगडावर कोरलेला, अत्यंत सुबक अक्षरांतील शिलालेख संशोधकांच्या हाती लागला. या शिलालेखाचे वाचन शेषाबाई मुंढे महाविद्यालयातील इतिहास विभागाचे संशोधक प्रा. डॉ. अविनाश खोकले यांनी केले. हा शिलालेख लेफ्टनंट एच. ए. हॉवेल या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे. २० डिसेंबर १८०९ रोजी गोदावरी नदीत स्नान करत असताना मगरीने त्यांना ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी नोंद यात आढळते. विशेष म्हणजे, ही घटना आणि संबंधित माहिती आजपर्यंत इतिहासात कुठेही स्पष्टपणे नोंदलेली दिसत नाही. या पुराव्यामुळे गंगाखेडच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण पान जोडले गेले असून, भविष्यात या भागात आणखी संशोधनातून इतिहासाची पाने खुली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मूळ शिलालेख इंग्रजी भाषेत
मूळ शिलालेख इंग्रजी भाषेत असून, अनेक शब्द अस्पष्ट असतानाही सखोल अभ्यास करून त्याचा मराठी अनुवाद करण्यात आला आहे. या शिलालेखातून त्या काळातील ब्रिटिश सैन्याची उपस्थिती आणि गंगाखेडचे सामरिक महत्त्व अधोरेखित होते.

तिसऱ्या निजामाच्या कालखंडातील शिलालेख
प्रा. डॉ. खोकले यांच्या मते, हा शिलालेख हैदराबादच्या तिसऱ्या निजाम सिकंदर अली खान (इ.स. १८०३–१८२९) यांच्या कालखंडातील आहे. निजाम संस्थानने ब्रिटिशांची तैनाती फौज स्वीकारल्यानंतर गंगाखेड येथे मोठ्या प्रमाणात सैन्य छावण्या आणि प्रशिक्षण केंद्र कार्यरत होते. त्यामुळे या भागात इंग्रजांचा वावर मोठ्या प्रमाणात होता, याची पुष्टी या शिलालेखातून मिळते.

ऐतिहासिक वारशाची साक्ष
गंगाखेड हे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाचे महत्त्वाचे केंद्र असल्याचे या शोधामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हा शिलालेख शोधून काढण्यात गोदावरी स्वच्छतादूत माणिकराव मुंढे आणि चंदन लटपटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title : गंगाखेड शिलालेख से 217 साल पहले मगरमच्छ के हमले में ब्रिटिश लेफ्टिनेंट की मौत का खुलासा

Web Summary : गंगाखेड शिलालेख में 217 साल पुरानी त्रासदी का खुलासा: 1809 में गोदावरी नदी में मगरमच्छ के हमले में एक ब्रिटिश लेफ्टिनेंट एच.ए. हॉवेल की मौत हो गई। यह खोज निज़ाम-युग की ब्रिटिश सैन्य उपस्थिति पर प्रकाश डालती है।

Web Title : GangaKhed Inscription Reveals Crocodile Attack on British Lieutenant 217 Years Ago

Web Summary : GangaKhed inscription unveils a 217-year-old tragedy: a British Lieutenant, H.A. Howell, was killed by a crocodile in the Godavari River in 1809. The discovery sheds light on Nizam-era British military presence.