१२ हजार व्यक्तींना सहव्याधी; तातडीने उपचारासाठी सुचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:07+5:302021-06-01T04:14:07+5:30

कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आरोग्य विभागामार्फत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली होती. ...

12 thousand people with comorbidities; Promptly suggested for treatment | १२ हजार व्यक्तींना सहव्याधी; तातडीने उपचारासाठी सुचविले

१२ हजार व्यक्तींना सहव्याधी; तातडीने उपचारासाठी सुचविले

कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आरोग्य विभागामार्फत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली होती. या मोहिमेअंतर्गत राज्यभरात शहर व ग्रामीण भागात कोरोना संशयित व्यक्ती तसेच इतर सहव्याधी असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला होता. परभणी जिल्ह्यातही दोन टप्प्यात सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात पहिल्या टप्प्यात १६ लाख ४९ हजार १५० तर दुसऱ्या १६ लाख ७३ हजार ३२६ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पहिल्या टप्प्यात ८ हजार ९६६ व्यक्तींना तर दुसऱ्या टप्प्यात २ हजार ८७० व्यक्तींना सहव्याधी असल्याचे स्पष्ट झाले होते. सहव्याधी आढळलेल्या व्यक्तींना आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेण्यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य संख्यांमध्ये दाखल होण्यास सुचविले होते.

कोविडचे १९२ तर सारीचे १६८५ रुग्ण

आरोग्य विभागाच्या वतीने दोन टप्प्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कोविडचे एकूण १९२ रुग्ण आढळले. तसेच सारीचे पहिल्या टप्प्यात ९७४ तर दुसऱ्या टप्प्यात ७११ असे एकूण १६८५ रुग्ण आढळून आले. या रुग्णांना उपचारसाठी तातडीने रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोविड व सारी व्यतिरिक्त जिल्ह्यात इतर आजारांचे पहिल्या टप्प्यात ३ हजार ५०९ तर दुसऱ्या टप्प्यात ७२४ रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

पुढे काय?

सहव्याधी आढळलेल्या जिल्ह्यातील एकूण ११ हजार ८३६ व्यक्तींना आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे सूचित करण्यात आले. तसेच रुग्णांना ई-संजीवनी या मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या उपचाराच्या अनुषंगाने दररोज तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून आजही शेकडो रुग्ण मार्गदर्शन घेत असल्याचे या विभागाने सांगितले.

परभणीत जास्त

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात इतर शहरांच्या तुलनेत परभणी शहरात सर्वाधिक रुग्ण सहव्याधी असलेले आढळून आले. त्यात पहिल्या टप्प्यात शहरात ७५४ तर दुसऱ्या टप्प्यात ३०५ रुग्ण आढळले आहेत.

‘परभणी जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींना तसेच सारीचे रुग्ण आढळलेल्या व्यक्तींना तातडीने आरोग्य संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिवाय त्यांना स्थानिक आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. त्यांची योग्य ती काळजी घेण्यात आली.

-डॉ. शंकर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: 12 thousand people with comorbidities; Promptly suggested for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.